नवरदेवाला 50 हजार रूपयाचा दंड : गुहागर तालुक्यातील शीर येथील घटना,जितील पहिली मोठी कारवाई
प्रतिनिधी / गुहागर
कोरोना प्रादुर्भावामधील लॉकडाऊनमुळे विवाहोत्सुकांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याबद्दलच्या अनिश्चिततेमुळे अनेक कुटुंबे शासन नियमांनुसार विवाह शब्दशः उरकून घेत आहेत. अशातच स्वतः पॉझिटीव्ह असताना बोहल्यावर चढलेल्या नवरदेवावर 50 हजार रूपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यातील शीर येथे घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या विवाह सोहळयात सहभागी सर्वांना घरीच क्वारंटाईन करून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
गुहागर तालुक्यातील शीर येथील या घटनेतील नवरदेव याच तालुक्यातील सडेजांभारी खालचीवाडी येथील आहे. शीर येथील वधुकडे बुधवारी सकाळी 8.40 वाजता हा विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळा दोन तासामध्ये पूर्ण करण्याची सुचना ग्रामकृतीदलाने दिली होती. अशावेळी शीरचे ग्रामसेवक एकनाथ पाटील यांना नवरदेव कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती मिळाली. यामुळे 12.30 वाजता नवरदेवाचा शोध घेण्यासाठी शीरचे ग्रामकृतीदल विवाहस्थळी दाखल झाले. धक्कादायक बाब म्हणजे तोपर्यंत हा विवाह सोहळा सुरूच होता. नवरदेवही नटून-थटून सज्ज होते. ग्रामकृतीदलाने विवाहात सहभागी लोकांकडे तपासणी अहवालाबाबत विचारणा केली. यावेळी आपला तपासणी अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे नवरदेवाने सांगितले. वधूपक्षाकडील मंडळींनी मात्र कानावर हात घेत या बाबत आपल्याला कोणतीच कल्पना नसल्याचे सांगितले. अखेर शीर ग्रामपंचायतीने नवरदेवावर रू. 50 हजार ची दंडात्मक कारवाई केली आहे.
दोन तासामध्ये विवाह पार पडण्याची जबाबदारी असताना दोन्ही पक्षाकडील लोकांनी नियमांचे पालन न केल्याचे व नवरदेव स्वतःच कोरोनाबाधित असल्याने साथ रोग नियंत्रण प्रसाराबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या विवाह सोहळय़ामध्ये सहभागी झालेल्या सर्वांची तपासणी करण्याची मोहीम आखली जाणार आहे. तोपर्यंत या सर्वांना घरीच क्वारंटाईन राहण्याच्या सूचना शीर ग्रामकृतीदलाने दिल्या आहेत. या बाबत तालुका व जिल्हा प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.