प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील राजीवडा येथील एका कोरोना पॉझिटीव्ह गर्भवती महिलेला रूग्णालयात नेण्यासाठी आरोग्यसेवकांना तासभर समजूत काढावी लागली. संबधीत महिलेल्या अहवालाबाबतच शंका घेत कुटुंबीयांनी व शेजारच्या लोकांनीही तिला रूग्णालयात नेण्यास विरोध केला. अखेर पोलीसांना पाचारण करून सामंज्यसाने समजूत काढत गर्भवती महिलेला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात नेण्यात आले.
संबंधित महिलेची प्रसुती तारीख जवळ आल्याने तपासणीसाठी तिचा स्वॅब घेण्यात आला होता. रविवारी रात्री 9 वाजता तिचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्वरीत आरोग्य सेवक राजीवडा येथे गेले. मात्र, ती पॉझिटीव्ह असल्याचे नाकारत कुटुबीय नातेवाईकांनी तिला उपचारासाठी सिव्हीलमध्ये येण्यास नकार दिला. संबधीत महिलाही रूग्णालयात दाखल व्हायचे नसल्याचे सांगत होती. मात्र आरोग्य सेंवकांनी तासभर समजूत काढत तिचे गैरसमज दूर करत रूग्णालयात जाण्यास तिला तयार केले. मात्र शेजाऱयांनी विरोध सुरू केला. त्यामुळे परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलीसांना बोलवण्यात आले. पोलीसांच्या मध्यस्थीने सर्वांना शांत करत या महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी जिल्हा रूग्णालय प्रसुती विभागातील पाच मातांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आता प्रसुतीला दाखल करण्यापूर्वी कोरोनाची चाचणी केली जाते.