हॉलिवूड पॉप सिंगर रिहाना आणि रॅपर रॉकी हे पालक झाले आहेत. रिहानाने एका मुलाला जन्म दिला आहे. रिहानाला 13 मे रोजी लॉस एंजिलिसच्या रुग्णालयात पुत्ररत्न प्राप्त झाल्याचे समजते. रॅपर रॉकी हा रिहानाचा प्रियकर आहे. पुत्र झाल्यावर दोघेही लवकरच विवाह करतील अशी अपेक्षा आता त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत. रॉकी आणि रिहाना परस्परांना दीर्घकाळापासून डेट करत आहेत. परंतु दोघांनी स्वतःच्या नात्याची 2021 मध्ये जाहीरपणे कबुली दिली होती.
रिहाना आणि रॉकी हे आता नवजातासोबत लॉस एंजिलिस येथे घरात असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. रिहाना आणि रॉकी यांनी मात्र अद्याप मुलाला जन्म दिल्याच्या वृत्ताची पुष्टी केलेली नाही.
काही महिन्यांपूर्वी रॉकीवर रिहानाचा विश्वास मोडल्याचा आरोप झाला होता. रॉकी हा रिहानाचा ब्रँड फेंटी फुटवियरच्या डिझाइनर अमीना मुआदी यांना डेट करत असल्याची चर्चा होती. अमीनासोबतच्या रॉकीच्या नात्याची कल्पना येताच रिहानाने त्याच्यापासून अंतर राखल्याचे बोलले जात होते. परंतु अमीनाने या सर्व चर्चा फेटाळून लावत सोशल मीडियावर स्वतःची भूमिका मांडली होती.