आयपीएल साखळी सामना : पंजाब विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील, मागील पराभवाची परतफेड करण्यावर चेन्नईचा फोकस, चेन्नईची भिस्त धोनीवरच
वृत्तसंस्था / मुंबई
‘पॉवर पॅक’ पंजाब किंग्सविरुद्ध आज होणाऱया आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स संघाचा गोलंदाजीत सुधारणा करण्यावर अधिक भर असणार आहे. यापूर्वी, पहिल्या लढतीत चेन्नईला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 7 गडय़ांनी पराभव पत्करावा लागला तर पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 4 धावांनी निसटता विजय खेचून आणला होता. वानखेडे स्टेडियमवर ही लढत असल्याने येथेही नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याची शक्यता अधिक असेल.
या मोसमातील पहिल्या लढतीत चेन्नईने 7 बाद 188 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. सुरेश रैना (54), मोईन अली (36), सॅम करण (34), रविंद्र जडेजा (26) व अम्बाती रायुडू (23) यांची फटकेबाजी त्यात महत्त्वाची ठरली होती.
ऋतुराज गायकवाड व फॅफ डय़ू प्लेसिस हे दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले असताना देखील चेन्नईचा संघ या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यात यशस्वी ठरला होता. पण, याचप्रमाणे चेन्नईची गोलंदाजी मात्र अपेक्षापूर्ती करु शकली नाही. दिल्लीच्या धवन व पृथ्वी शॉ या जोडीने त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. या जोडीने चेन्नईविरुद्ध 138 धावांची भरभक्कम शतकी भागीदारी साकारली आणि तिथेच निकाल निश्चित झाला होता.
22 कोटीच्या दोन गोलंदाजांचा खराब फॉर्म ही पंजाबची चिंता
या मोसमातील पहिल्या लढतीत पंजाबला युवा अर्शदीप सिंगच्या (3-35) शेवटच्या षटकातील भेदक गोलंदाजीमुळेच विजय संपादन करता आला. झाय रिचर्डसन (1-55), रिले मेरेडिथ (1-49) यांची महागडी गोलंदाजी मात्र पंजाबसाठी चिंतेची ठरली. या उभयतांसाठी पंजाबने एकत्रित 22 कोटी रुपये मोजले आहेत. त्यांनी झाय रिचर्डसनला 14 कोटी रुपये तर मेरेडिथला 8 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.
प्रतिस्पर्धी संघ
चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक व कर्णधार), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.
पंजाब किंग्स : केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रबसिमरन सिंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सर्फराज खान, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, दर्शन नळकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोईसेस हेन्रिक्यूज, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फॅबियन ऍलेन, सौरभ कुमार.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.