– कसबा बावडा येथील झूम प्रकल्पातील घटना
प्रतिनिधी/कोल्हापूर
कसबा बावडा येथील झूम प्रकल्पामध्ये स्क्रॅप गोळा करणाऱ्या महिलेचा पोकलँडच्या बकेटमध्ये सापडून दुर्देवी मृत्यू झाला. मंगल राजेंद्र दावणे (वय 50 रा. तिरंगा चौक, शिवाजी पेठ) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोकलँड मशिनच्या बकेटमध्ये महिलेचे मुंडके अडकले होते, तर तीचे शरीर कचऱ्यात पडले असल्याची हदयद्रावक घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगल दावणे स्क्रॅप गोळा करण्याचे काम करतात. गेल्या 20 ते 25 वर्षापासून त्या हे काम करतात. त्यांचा मुलगा प्रकाश सेंट्रीगचे काम करतो. रविवारी सकाळी 6 वाजता मंगल दावणे नेहमीप्रमाणे स्क्रॅप गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. सकाळी 11 वाजता कसबा बावडा येथील झूम प्रकल्पातील डंपीग ग्राउंड येथे त्या कचऱयातील स्क्रॅप गोळा करत होत्या. यावेळी शहरातील गोळा झालेला कचरा एकत्र करण्याचे काम पोकलँड मशिनच्या सहाय्याने या ठिकाणी सुरु होते. मशिन एका विशीष्ठ उंचीवर होते. तर मंगल दावणे या त्याच्या शेजारी असणाऱया खोल बाजूस स्क्रॅप गोळा करत होत्या. यावेळी पोकलँड मशीनच्या बकेटमध्ये अचानक महिलेचे मुंडके आले. तर त्यांचे शरीर काही अंतरावर पडले होते. अन्य कचरा गोळा करणाऱया महिलांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी याची माहिती पोकलँड चालकास दिली. पोकलँड चालकाने तात्काळ काम थांबविले. तेथील महापालीकेच्या कर्मचाऱयांनी या घटनेची माहिती विभागीय आरोग्य निरीक्षक निखील पाडळकर व अग्नीशमन दलाचे मनिष रणभिसे यांना दिली. हे दोघे ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची माहिती शाहूपुरी पोलीसांना दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी कचऱयातून मृतदेह बाजूला काढला. तर मृतदेहाच्या मुंडक्याची शोध मोहिम सुरु केली. पोलीसांनी दोघा पोकलँड चालकांना ताब्यात घेतले असून या घटनेची नोंद करण्याचे काम शाहूपीर पोलीस ठाण्यात सुरु होते. दरम्यान या घटनेमुळे झूम प्रकल्पावर मोठी गर्दी झाली होती. मंगल दावणे यांच्या पश्च्यात मुलगा, मुलगी, सुन, नातू असा परिवार आहे.
मुंडक्याची शोध मोहिम दोन तास
सकाळी 11 वाजता घडलेल्या या घटनेतील मृतदेहाच्या मुंडक्याचा शोध घेण्याची मोहिम दोन तासाहून अधिक वेळ सुरु होती. पोकलँडच्या सहाय्याने कचरा बाजूला करुन मुंडके शोध घेतले जात होते. दुपारी 1. 15 वाजण्याच्या सुमारास कचऱयाच्या ढिगाऱयातच मुंडके आढळून आले.