प्रतिनिधी/ सातारा
अल्पवयीन मुलगी घरात झोपली असताना आरोपीने घरामध्ये प्रवेश करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुह्यानुसार त्याला पोक्सो कायद्याअंतर्गत 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संतोष मच्छींद्र चवरे (वय 35, रा. प्रतापसिंहनगर खेड ता. सातारा) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, आरोपीने मुलीसोबत केलेल्या कृत्याबद्दल तिच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर यांनी करून आरोपीविरूद्ध जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्यात 4 साक्षीदार तपासण्यात आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरून आरोपीस शुक्रवार दि. 31 रोजी पोक्सो कायद्याअंतर्गत 3 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार दंड, हा दंड न दिल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठवण्यात आली.
या खटल्यात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उर्मिला घार्गे, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, सुधीर खुडे, गजानन फरांदे, महिला पोलीस नाईक रिहाना शेख, पोलीस कॉन्टेबल राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी तपासात योग्य ती मदत केली.