7 मार्च रोजी ’वायू शक्ती’ सराव ः पंतप्रधानांच्या इशाऱयानुसार क्षेपणास्त्रांचा होणार अचूक मारा
पोखरण / वृत्तसंस्था
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच पोखरणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हवाई दलाच्या फायटर जेट पायलट्सचा सराव कार्यक्रम रंगणार आहे. भारतीय हवाई दलाच्या ‘वायू शक्ती’ सरावात फायटर पायलट क्षेपणास्त्रांद्वारे निर्धारित लक्ष्य नष्ट करत आपली ताकद दाखवून देणार आहेत. पाकिस्तान सीमेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोखरणमध्ये 7 मार्चला हवाई दल शक्तीप्रदर्शन करणार आहे.
पोखरणमध्ये दर तीन वर्षातून एकदा हवाई दलाच्या कवायतींमधून भारताची ताकद दाखवली जाते. त्याचबरोबर देशाचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूचा सामना करण्यासाठी हवाई दल पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही देशाला देण्यात येते. ‘वायू शक्ती’ सराव केवळ हवाई दलाचे सामर्थ्य दाखवत नाही तर आमच्यासाठी ऑपरेशनल प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असतो. एकप्रकारे प्रत्यक्ष परिस्थितीसारखे वातावरण निर्माण करून ऑपरेशन (कारवाई) केले जाते. वायू शक्ती सरावात एकूण 148 विमाने सहभागी होणार आहेत. यामध्ये नल एअरबेसवरून 18, फलोदी एअरबेसवरून 29, जोधपूरहून 46, जैसलमेरहून 30, उत्रलाई येथून 21, आग्रा येथून 2 आणि हिंडन एअरबेसवरून 2 विमाने टेक ऑफ करतील. त्यात 109 लढाऊ विमाने, 24 हेलिकॉप्टर, 7 वाहतूक विमाने असतील, अशी माहिती वायुसेनेचे उपाध्यक्ष एअर मार्शल संदीप सिंग यांनी दिली.
जॅग्वार फायटर जेट रेकी कशी करावी हे दाखविण्याबरोबरच लक्ष्यावर 1000 पौंड बॉम्बदेखील टाकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्ष्य निवडतील आणि त्यावर बॉम्ब टाकला जाईल. राफेल फायटर जेट सुपरसॉनिक वेगाने उडताना दिसेल. तसेच ते हवेतून हवेत क्षेपणास्त्रे डागणार आहे. सुखोई-30 लढाऊ विमाने लढाऊ हवाई गस्त घालताना दिसतील, त्यानंतर लक्ष्यावर 1000 पौंड आणि 100 किलो वजनाच्या बॉम्बचा वर्षाव होईल. मिग-29 हे लढाऊ विमान त्यावर 500 किलो वजनाचा बॉम्ब टाकून लक्ष्य नष्ट करेल, असेही सिंग यांनी सांगितले.
अचूक लक्ष्यभेद
स्वदेशी हलके लढाऊ विमान तेजस लेझर गाईडेड बॉम्बद्वारे निर्धारित लक्ष्य अचूकपणे टिपेल. तेजस आर-73 क्षेपणास्त्र हवाई लक्ष्यावर डागेल आणि नंतर जमिनीवरील लक्ष्यावर 1000 पौंडचा बॉम्ब टाकेल. मिराज-2000 जमिनीवर 250 किलो वजनाचा एचएसएलडी बॉम्ब टाकेल. हॉक-132 हे लक्ष्यावर 68 एमएमचे रॉकेट डागण्याबरोबरच 1000 पौंडचा बॉम्बदेखील टाकेल. अपाचे अटॅक हेलिकॉप्टर हेलफायर क्षेपणास्त्र डागणार आहे, तर एमआय-35 लक्ष्यावर 80 मिमी रॉकेट डागणार आहे आणि स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर 70 एमएम रॉकेट फायर करेल. याशिवाय सी-17 ग्लोबमास्टर 10 कंटेनर एअरड्रॉप करेल.