बेंगळूर / प्रतिनिधी
२०२१ च्या पोटनिवडणुका ह्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या संभाव्य परीस्थितीचे सूचक नाहीत असे म्हणत पोटनिवडणुकीच्या निकालांमधुन काही निष्पन्न नसुन या निकालामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वावर कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही, असे मत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी व्यक्त केले.
“आम्ही या निवडणुकीला संयुक्त नेतृत्वाखाली सामोरे गेलो त्यामुळे आपण विजय आणि पराभवाचे श्रेय आणि दोष समान रीतीने स्विकारले पाहिजे, ते एकाच व्यक्तीवर ठेवू नये, पक्षाचे नेते एकत्र बसून या पराभवाच्या कारणांवर चर्चा करतील, 15 ते 20 दिवसांनंतर मी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार असुन पक्ष कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करेन आणि पक्ष मजबूत करण्यासाठी विशेष लक्ष देईन,” असेही पुढे येडियुरप्पा म्हणाले.
येडियुरप्पा यांनी, जुलैमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर लवकरच राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांना या ज्येष्ठ नेत्यासोबत जोडून, पक्षाच्या नेतृत्वाने एकसदसीय दौऱ्यात लगेच सुधारणा केली. हा दौरा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आला, आता येडियुरप्पा यांनी त्याच दिवशी दुसरी तारीख जाहीर केली आहे.