बेंगळूर/प्रतिनिधी
कॉंग्रेस पक्षाने गुरुवारी कर्नाटकमधील दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले. तर जनता दलाने (सेक्युलर) आतापर्यंत एका जागेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. सत्ताधारी भाजपने अद्याप उमेदवार निश्चित केले नाहीत. पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह शहरात बैठक घेत आहेत आणि लवकरच याबाबतची घोषणा करतील अशी माहिती आहे. दरम्यान बसवकल्याण (बिदरमध्ये) आणि मस्की (रायचूरमध्ये) पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे, तर सिंदगीसाठी अद्याप ही घोषणा होणे बाकी आहे.
ग्रेसने बसवकल्याणचे दिवंगत आमदार बी. नारायण राव यांच्या पत्नी मल्लम्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर बसावणगौड़ा आर. तुर्विहाळ यांना मस्की मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तुर्विहाळ यांनी कॉंग्रेसमध्ये जाण्यासाठी भाजपला सोडचिट्टी दिली होती.
२०१८ मध्ये तुर्विहाळ यांना कॉंग्रेसचे तत्कालीन उमेदवार प्रतापगौडा पाटील यांच्याकडून कमी फरकाने पराभव पत्करावा लागला होता. २०१९ मध्ये पाटील यांनी बंडखोरी करत भाजपमध्ये दाखल झाले. दरम्यान जद (एस) ने माजी आमदार दिवंगत एम.सी. मानगुळी यांचा मुलगा अशोक मानगुळी यांना सिंदगी मतदारसंघातील उमेदवार म्हणून घोषित केले.
जद (एस) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पक्षाने पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा केली आणि त्यांच्या पक्षाच्या निर्णयाबद्दलची अटकळ संपविली. तत्पूर्वी, पार्टीचे सुप्रीमो एच. देवेगौडा यांनी सांगितले होते की त्यांचा पक्ष बेळगाव लोकसभा आणि बसव कल्याण, सिंदगी आणि मस्की विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक लढणार नाही.