5 मिनिटांमध्ये देणार चाचणीचा अहवाल 1 एप्रिलपासून प्रतिदिन 50 किट्सची निर्मिती
अमेरिकेच्या एबोट प्रयोगशाळेने कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी टेस्ट किट तयार केल्याचा दावा केला आहे. या किटद्वारे केवळ 5 मिनिटात कुठल्याही व्यक्तीला झालेल्या संसर्गाची पुष्टी मिळू शकणार आहे. हे किट पुढील आठवडय़ापर्यंत उपलब्ध होणार आहे. हे किट अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये पाठविण्याची तयारी केली जात आहे.
टेस्ट किटचा आकार एखाद्या छोटय़ा टोस्टरसारखा आहे. या किटमध्ये मॉल्यूलर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह चाचणी निष्कर्ष 5 मिनिटांत तर निगेटिव्ह चाचणीचा निष्कर्ष 13 मिनिटांत प्राप्त होतो. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने किट तयार करण्यासाठी पुढील आठवडय़ापर्यंतची मुदत दिली होती अशी माहिती एबोट प्रयोगशाळेचे अध्यक्ष रॉबर्ट फोर्ड यांनी दिली आहे.
आकाराने लहान असल्याने हे किट रुग्णालयाच्या बाहेरही सहजपणे वापरता येणार आहे. एफडीएफ अधिकाऱयांसोबत मिळून हे किट महामारीचा केंद्रबिंदू ठरलेल्या भागात पाठविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु अधिकाऱयांनी अद्याप यासंबंधी मंजुरी दिलेली नाही. याचा वापर केवळ आपत्कालीन स्थितीत आरोग्य अधिकाऱयांकडून केला जाणार असल्याचे फोर्ड म्हणाले.
1 एप्रिलपासून प्रतिदिन 50 हजार टेस्ट किट्स तयार केले जाणार आहेत. कोरोना जिनोमच्या प्रेगमेंट्सला मॉल्युक्यूलर तंत्रज्ञानाने ओळखून हे किट निष्कर्ष प्रदान करत आहे. टेस्ट किटला न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन आणि अन्य क्षेत्रांमधील रुग्णालयांमध्ये पाठविण्यासाठी मंजुरी घेतली जत आहे.