वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनीतील लक्झरी कार निर्माती कंपनी पोर्शे इंडिया यांच्यासाठी 2022 हे गतवर्ष चांगल्या कामगिरीचे ठरले आहे. पोर्शे इंडिया यांनी 2022 मध्ये भारतामध्ये एकूण 779 कार्सची विक्री केली आहे. 2021 च्या तुलनेमध्ये पाहता विक्री 64 टक्के अधिक नोंदली गेली आहे.
सदरच्या विक्रीतील वाढीचा कंपनीला अत्यानंद झाला असून कंपनीच्या कार्सना मिळत असलेली लोकप्रियता आमच्यासाठी महत्त्वाची ठरली आहे, असे कंपनीच्या अधिकाऱयांनी सांगितले. मागच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये 474 कार्सची विक्री भारतामध्ये झाली होती. कंपनीच्या सुव गटातील कार्स व स्पोर्ट्स कार्सना भारतीय ग्राहकांनी चांगली पसंती दर्शविली आहे.
इलेक्ट्रिक टायकॅनलाही पसंती
प्रीमीयम गटातील टायकॅन या इलेक्ट्रिक कारची विक्री भारतामध्ये 78 इतकी झाली आहे. इलेक्ट्रिक कारप्रतीदेखील ग्राहक चांगली नोंदणी करत आहेत. मागच्या वर्षी पोर्शे इंडिया कंपनीने बेंगळूर, चेन्नई, कोलकत्ता येथे नवी तीन विक्री केंद्रे सुरू केली आहेत. एकंदर आगामी काळात भारतात आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असतील.