भारतीय वंशाची अमेरिकन सौंदर्यवती श्रीसैनी उपविजेतीa
वृत्तसंस्था / प्यूर्टो रिको
मिस वर्ल्ड 2021 चा मान पोलंडची सौंदर्यवती कॅरोलिना बिलाव्स्काने मिळविला आहे. प्यूर्टो रिकोमध्ये आयोजित झालेल्या 70 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारतीय वंशाची अमेरिकन सौंदर्यवती श्री सैनी प्रथम उपविजेती राहिली. तर आयव्हरी कोस्टची ओलिविया येस द्वितीय उपविजयी ठरली. 2019 ची विश्वसुंदरी टोनी एन सिंहने 23 वर्षीय कॅरोलिनाला विश्वसुंदरीचा मुकुट घातला आहे.
स्पर्धेत प्रथम उपविजेती ठरलेली श्री सैनी मूळची लुधियाना येथील आहे. तिचा जन्म लुधियानाच्या मेजर शिवदेव सिंह नगरमध्ये झाला होता. ती 5 वर्षांची असताना तिचे वडिल संजीव आणि आई एकता अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये स्थलांतरित झाले होते. शिक्षणादरम्यान श्री सैनी मॉडेलिंग देखील करत होती. यापूर्वी तिने मिस इंडिया युएसए 2017 चा मान मिळविला होता.
विश्वसुंदरीचा मान मिळविणारी कॅरोलिना पेशाने मॉडेल आहे. ती सध्या व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतेय. पीएचडी करून ती प्रेरणादायी वक्ता होऊ इच्छिते. कॅरोलिनाला पोहणे आणि स्कुबा डायव्हिंगचा छंद आहे.
स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेली मनसा वाराणसी पहिल्या 13 स्पधर्कांमध्ये सामील राहिली, परंतु पहिल्या 6 जणींमध्ये तिला स्थान मिळविता आले नाही. यापूर्वी 2017 मध्ये भारताच्या मानुषी छिल्लरने विश्वसुंदरी होण्याचा मान मिळविला होता. आतापर्यंत भारताच्या 6 सौंदर्यवतींनी हा मान मिळविला आहे.