रोम (इटली)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धत पोलंडच्या टॉप सीडेड इगा स्वायटेकने सॅबेलिनेकाचा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. स्वायटेकने अलिकडच्या कालावधीत सलग 27 सामने जिंकले आहेत.
शनिवारी झालेल्या एकेरीच्या उपांत्य सामन्यात स्वायटेकने सॅबेलिनेकाचा 6-2, 6-1 असा फडशा पाडला. स्वायटेकने अलिकडच्या कालावधीत डब्ल्यूटीए टूरवरील सलग चार स्पर्धा जिंकल्या आहेत. या स्पर्धेतील ती विद्यमान विजेती आहे. या स्पर्धेनंतर तिचे लक्ष आगामी प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेवर राहील. बेलारूसच्या सॅबेलिनेकाला उपांत्य सामन्यात कडवा प्रतिकार करता आला नाही. टय़ुनेशियाची जेबार आणि बिगर मानांकित कॅसेटकिना यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार असून या सामन्यातील विजयी खेळाडूबरोबर स्वायटेकची जेतेपदासाठी लढत होईल.