प्रतिनिधी / वास्को
काही सामाजीक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी वास्कोत कोळसा वाहतुकीविरूध्द निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. त्यांना शहरातील आयओसी नाक्यावर थोडक्यात हा उपक्रम गुंडाळावा लागला. चिखली नाका, विमानतळ नाका, शांतीनगर नाका तसेच मांगोरहिलच्या नाक्यावर पोलिसांनी निदर्शकांना रोखण्यासाठी कडे केले होते.
कोळसाविरोधी आंदोलनाचा एक भाग म्हणून काही संघटनांचे कार्यकर्ते वास्कोत येणार असल्याची चाहुल लागल्याने पोलिसांनी सर्वत्र नाका बंदी केली होती. सोमवारी संध्याकाळी साडे तीनच्या सुमारास वास्को शहरातील आयओसीमागील एमपीटीच्या शेवटच्या गेटजवळ ही कोळसा विरोधी निदर्शने होणार होती. परंतु पोलिसांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. अवघ्येच काही कार्यकर्ते शहरात दाखल होण्यात यशस्वी ठरले. मात्र, त्यांना एमपीटीच्या गेटजवळ पोहोचू दिले नाही. आयओसी नाक्यावरही पोलीस फौजफाटा कडे करून होता. त्यामुळे ही निदर्शने थोडक्यात गुंडाळण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी आपली कोळसाविरोधी भूमीका पोलिसांसमोर मांडली. समाजसेविका तारा केरकर यांनीही या कार्यकर्त्यांसमवेत कोळसा वाहतुकीविरूध्द मतप्रदर्शन केले. कोळशामुळे वास्कोत प्रदुषणाची गंभीर समस्या उद्भभवलेली असल्याचे त्यांनी सांगितले.