बेळगाव रेल्वेस्थानकावरील व्हिडिओ व्हायरल
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव रेल्वे स्थानकावरील एक काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चिमुकलीने चालत्या रेल्वेत उडी टाकली आणि पुन्हा डब्यामध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु ती डब्याच्या पायऱयांवर पडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत तिला बाजुला खेचले. पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधनाने त्या चिमुकलीचा जीव वाचला.
हा व्हायरल व्हिडिओ 1 डिसेंबर मध्यरात्रीचा आहे. हजरत निजामुद्दीन येथून वास्कोला जाणारी गोवा एक्स्प्रेस रात्री 1.55 च्या सुमारास बेळगावमध्ये रेल्वेस्थानकात दाखल होत होती. त्यानंतर काही वेळाने वास्कोकडे मार्गस्थ झाली. रेल्वेची गती कमी असल्याने एका लहान मुलीने प्लॅटफॉर्मवर उडी घेतली. तिने पुन्हा डब्यामध्ये चढण्याचा प्रयत्न केला परंतु ती डब्याच्या पायऱयांवर पडून फरफटत गेली.
रात्रपाळीसाठी असलेल्या रेल्वे पोलिसांनी तात्काळ डब्याकडे धाव घेवून मुलीला ओढण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत वाचविण्यास गेलेला होमगार्डही खाली कोसळला. त्यावेळी पोलीस सिद्दय्या हिरेमठ यांनी त्या दोघांनाही बाहेर ओढून काढले. त्यामुळे मुलीसोबतच होमगार्ड एच. बी. नेसरगी यांचाही जीव वाचला.