वार्ताहर/ मायणी
जिल्हय़ात कोरोनाची भयानक परिस्थिती असल्याने निर्बंध घातले आहेत. अशा परिस्थितीत मायणी पोलीस दूरक्षेत्रातील अनफळे (ता. खटाव) येथे न्यायालयाच्या बंदीचा आदेश धुडकावून हजारोंचा जमाव जमवून बैलगाडय़ा शर्यती पोलिसांच्या वरदहस्ताने संपन्न झाल्या. या शर्यतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाल्याने जिल्हाधिकाऱयांच्या जमावबंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शर्यती सकाळी 9.30 पर्यंत पार पाडल्यास 35 हजार अन् उशीर लागला तर अधिक पैसे द्यावे लागतील अशी तंबी एजंटाने दिली होती. रविवारच्या शर्यतीला विलंब झाल्याने तब्बल 60 हजार रुपये त्या एजंटाने घेतल्याची माहिती आहे. तो वसुली एजंट पोलीस कर्मचारी असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे या घटनेची पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मे 2014 मध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यतीवर संपूर्ण देशांमध्ये बंदी घातली आहे. असे असतानाही अनफळे गावालागतच्या खातवळ-मायणी रस्त्यालगत हजारो लोकांच्या उपस्थितीत लाखो रकमेच्या बक्षिसांची खैरात या शर्यतीच्या माध्यमातून होत आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा सामना धैर्याने करीत सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. यातच खटाव तालुक्यातील कोरोनाच्या आकडेवारीत भितीदायक वाढ होत असताना जिह्यातील विविध ठिकाणाहून बैल जोडी सोबत येणाऱया व प्रेक्षक म्हणून याठिकाणी एकत्र होणाऱयांच्या हजारो संख्येच्या जमावामुळे जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असून हे शर्यतीचे ठिकाण म्हणजे कोरोना विस्फोटाचे कारणही ठरू शकते.
राजकीय क्षेत्रासह अनेक क्षेत्रात नावलौकिक असणाऱया मायणी गावात अशाप्रकारे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असताना 3 ते 4 किमी अंतरावरील मायणी पोलीस प्रशासन झोपेचे सोंग घेतलेले पहावयास मिळत आहे. या सर्व प्रकाराला नेमका कोणाचा वरदहस्त असून जिह्यातील अनेक ठिकाणाहून याठिकाणी डेरेदाखल होणाऱया बैलवाहतुक करणाऱया गाडय़ा मायणीची चौतर्फा कोणतीही परवानगी नसताना सर्वसामान्यांवर कारवाईवाईचा बडगा उगारणाऱया पोलिसांना दिसला नाही का?
सर्वसामान्य जनता व व्यापारी कोरोना भितीपोटी जिल्हाधिकाऱयांच्या लॉकडाउनला प्रतिसाद देऊन सहकार्य करीत असताना हजारोच्या संख्येने संपन्न होणाऱया बैलगाडी शर्यतींकडे स्थानिक पोलीस विभाग आर्थिक तडजोडीतून कानाडोळा करीत असल्यास याप्रश्नी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे संबंधितांवर कोणती कारवाई करतात हे पहावे लागेल.