मुख्यमंत्र्यांकडून आज पोलीस महासंचालकांना नियुक्तीचे आदेश
प्रतिनिधी /बेंगळूर
गुन्हे झालेल्या ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने पाहणी तसेच सर्व प्रकारचे पुरावे जमा करून गुन्हेगारांचा त्वरित शोध घेता यावा, यासाठी अनुभवी पोलीस अधिकाऱयाची नियुक्ती केली जाणार आहे. त्याकरिता पोलीस दलामध्ये गुन्हा स्थळ परिशिलन अधिकारीपद (सीन ऑफ क्राईम ऑफिसर) निर्माण करण्यात आले आहे. देशात प्रथमच कर्नाटकामध्ये अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा मंगळवारी राज्य पोलीस महासंचालकांना गुन्हा स्थळ परिशिलन अधिकारीपदांच्या भरतीच्या आदेशाची प्रत देणार आहेत. कोणत्याही ठिकाणी एखादा गुन्हा घडला तर त्या ठिकाणी तातडीने धाव घेऊन तेथील पुरावे जमा करणे, प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेणे, जमा केलेले पुरावे अत्यंत सुरक्षितपणे फोरेन्सिक लॅबला पाठविणे आदी कामांसाठी या अधिकाऱयांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. आतापर्यंत हे काम स्थानिक पोलीस अधिकारीच करत होते. मात्र, यापुढे पहिल्या टप्प्यात गंभीर स्वरुपाच्या गुन्हय़ांच्या ठिकाणी तपास करण्यासाठी फोरोन्सिक लॅबमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलेले पथक भेट देतील.
गुन्हे नियंत्रणात येण्यास मदत
अशा प्रकारे नेमण्यात येणाऱया अधिकाऱयांमुळे प्रकरणांचा छडा त्वरित लावणे शक्य होणार आहे. शिवाय गुन्हेगारीही नियंत्रणात येण्यास मदत होईल. अशी व्यवस्था विकसित देशांमध्ये आहे. त्यामुळे कर्नाटकातही त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पहिल्या टप्प्यात 206 अधिकारीपदे मंजूर केली आहेत. मंगळवारी यासंबंधीचा अधिकृत आदेश गृहखात्याला देणार आहेत.
पोलिसांच्या मुलांसाठी ‘विद्यानिधी-2’
पोलिसांचे आरोग्यहित जोपासणाऱया ‘आरोग्यभाग्य’ योजनेविषयी संपूर्ण माहिती असणारी पुस्तिका पोलीस कर्मचाऱयांना देण्यात येतील. या पुस्तेकेचे प्रकाशनही मुख्यमंत्री करणार आहे. पोलिसांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ‘विद्यानिधी-2’ योजनेचाही ते शुभारंभ करणार आहेत. अग्नीशमन दल, गृहरक्षक दल आणि इतर शाखेतील उत्तम कामगिरी केलेल्या पालिसांना सेवा पदकेही वितरीत केली जाणार आहेत, अशी माहिती बोम्माई यांनी दिली.