फिल्डवर डय़ुटी करणाऱयांना खटारी, बिनभरवशाची वाहने : वरिष्ठांना, त्यांच्या कुटुंबियांना नव्याकोऱया गाडय़ा : वाहने नसल्याने ‘हाय वे पेट्रोलिंग’ आहे बंद खात्याला 29 नव्या वाहनांची आवश्यकता
प्रतिनिधी / पणजी
पोलीस खात्यात वाहनांची कमतरता असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. निकामी ठरविण्यात आलेली वाहने पीसीआरसाठी वापरात आणावी लागत आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील गस्तीची दहा वाहने बंद करण्यात आली असून ती पोलीस स्थानकांना देण्यात आली आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी वेळीच पोलीस पोचणे कठीण बनले आहे.
पोलीस खात्यातील 2011 सालापूर्वीची वाहने निकामी झाल्याचे ठरविण्यात आले होते. सध्यस्थितीत पोलीस खात्याकडे वाहने नसल्याने निकामी ठरविण्यात आलेली वाहनांची दुरुस्ती करून काही पोलीस विभागाना देण्यात आली असल्याने पोलीस खात्याचा सगळाच कारभार बिनभरवशाचा ठरलेला आहे. आजही पोलीस खात्याला 29 नव्या वाहनांची आवश्यकता असून त्याबाबत कोणतीच हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे.
वरिष्ठांना अन् त्यांच्या कुटुंबियांना नवी वाहने
पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी नव्याकोऱया वाहनांतून ये जा करीत असतात. मात्र प्रत्यक्षात फिल्डवर डय़ुटी बजावणाऱया पोलीस कर्मचाऱयांना डय़ुटी बजावताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. केवळ पोलीस अधिकाऱयांनाच नवी वाहने नव्हे तर काही वेळा त्यांच्या नातेवाईकांनाही पोलीस खात्याची नवी वाहने पुरविली जातात आणि पोलीस स्थानकावर जुन्या वाहनांचा वापर करून काम चालवून घेतले जात असल्याचे दिसून येत आहे.
पीसीआरसाठी खटारी, धोकादायक वाहने
फेब्रुवारी 2019 मध्ये पोलीस खात्याला 43 नवी वाहने देण्यात आली होती. त्यावेळी पोलीस खात्यात असलेली पीसीआर विभागाची 31 वाहने निकामी ठरवून त्या जागी नवी 31 वाहने घेण्यात आली होती. राहिलेली 12 वाहने राष्ट्रीय महामार्गावर गस्तीसाठी वापरण्यात येत होती. सध्या स्थितीत पीसीआर विभागाची आणखी 15 वाहने निकामी झाली असल्याने वाहनांची कमतरता पडू लागली आहे.
पणजी, मडगावसाठी किमान चार पीसीआरची गरज
पणजी, मडगावसारख्या महत्वाच्या पोलीस स्थानकांना किमान 4 पीसीआर वाहने असणे महत्वाचे आहे, मात्र सध्या वाहनांची कमतरता असल्याने 2 पीसीआर वाहनांद्वारे काम चालवून घेत आहेत.
अनेक पोलीस स्थानकांना हवीत तीन पीसीआर
सध्या मायणा कुडतरी, कोलवा, कुंकळी, केपे, वेर्णा, कुडचडे, काणकोण पोलीस स्थानक या पोलीस स्थानकांकडे किमान 2 ते 3 पीसीआर वाहने असणे आवश्यक असताना तिथे केवळ एकाच पीसीआर वाहनाने काम चालवून घेतले जात आहे.
पोलीस स्थानकांची पीसीआर वाहने जुनीच
म्हापसा पोलीस स्थानकात 2, डिचोलीत 2 तर पणजी पोलीस स्थानकात 3 पीसीआर वाहने कार्यरत आहेत. जी पीसीआर वाहने कार्यरत आहे ती जुनी वाहने दुरुस्ती करून देण्यात आली आहेत. एकंदरीत पोलीस स्थानकात असलेल्या पीसीआर वाहनांचा कारभार बिनभरवशाचा ठरलेला आहे. ठरलेल्या ठिकाणी ही वाहने पोचतीलच याचा भरवसा नाही.
पोलिसांना ‘वेंटिलेटर’वरील वाहनांद्वारे करावा लागतो प्रवास
काही भागातील वाहतूक विभागानांही निकामी ठरविण्यात आलेली वाहने देण्यात आली असल्याने पोलीस खात्यातील अधिकाधिक वाहने व्हेंटीलेटरवर असतानाही काम चालवून घेत आहे. कुठले वाहन कधी आणि कुठे बंद पडेल याचा नेम नाही. हणजूण व केपे पोलीस वाहतूक विभागाकडे असलेले वाहन हे 2009 सालातील आहे. पणजी पोलीस स्थानकाकडे असलेली पीसीआर वाहने ही 2006 व 2004 सालातील आहेत. वाळपई पीटीएसमध्ये असलेले वाहन हे 2008 सालातील आहे. बेतूल व शापोरा किनारी विभागाकडे असलेली वाहने ही 2008 सालातील आहेत. एकूणच पोलीस खात्यातील विविध विभागांकडे असलेली जवळजवळ सर्वच वाहने ही निकामी ठरवलेली असल्याने या वाहनावर चालक म्हणून काम करणारे पोलीस नेहमी तारेवरची कसरत करीत असतात.