प्रतिनिधी/ वाई
वाई पोलीस स्टेशनचे अधिकारी, महिला व पोलीस कर्मचारी प्राणाची बाजी लावून भर उन्हात रस्त्यावर उतरून नियमांचे उल्लंघन करणाऱया नागरिकांवर दंडात्मक कारवाईसह वहाने जप्त करण्याचे नियमित काम करीत आहेत. यातून आजअखेर 13 लाख रुपयांची जमा झालेली रक्कम नगरपरिषदेकडे सुपूर्त करण्यात आली होती. पण या पोलिसांना वाई नगरपालिका साधं मास्क, सॅनिटायझरही देवू शकत नव्हते. अशा आशयाचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध होताच याची दखल घेत वाई नगरपालिकेने तत्काळ पोलिसांना मास्क व सॅनिटायझर देण्याचे आदेश काढले आहेत.
13 जमा झालेल्या रकमेतून पोलिसांच्या संरक्षणासाठी 500 मास्क आणि 50 लिटर सँनिटायझर देण्यात यावे अशी मागणी नगरपालिकेकडे वाई पोलिसांच्याकडून लेखी पत्राद्वारे करण्यात आली होती. पण या मागणीच्या पत्राला मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ आणि त्यांचे सहकारी अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली होती. ज्यांनी लाखो रुपये जमा करून दिले त्यांना थोडी फार स्वसंरक्षार्थ वस्तूरुपी अल्प मदत व्हावी या भावनेपोटी ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केल्याचा दणका वाई नगरपरिषदेला दिल्याने मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी त्याची गंभीर दखल घेत अखेर आज सभागृहाची मान्यता घेवून वाई पोलिसांना एन 95 दर्जाचे 500 मास्क आणि 50 लिटर सँनिटायझर देण्याचे जाहीर केले व तातडीने दोन दिवसात पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.