दोन उपनिरीक्षकांसह चारजण निलंबित
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गांजा तस्कराकडून जप्त केलेल्या 170 किलो गांजापैकी 169 किलो गांजाची परस्पर विक्री केल्याप्रकरणी दिल्लीतील जहांगीरपुरी पोलीस ठाण्यातील दोन उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त विजयंता आर्या यासंदर्भात माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबरला जहांगीरपुरी पोलीस ठाण्यातील एका हवालदाराने अनिल नावाच्या गांजा तस्कराला अटक केली. त्याच्याकडून 170 किलो गांजा जप्त करणात आला. मात्र, हवालदाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने पोलीस ठाण्यातील रेकॉर्डमध्ये अनिलकडून 920 ग्रॅम गांजा जप्त केल्याचे दाखवले. उर्वरित गांजा निलंबित पोलिसांनी परस्पर विक्री केला.
अनिलकडून 920 ग्रॅम गांजा जप्त केल्याचे दाखवल्यामुळे त्याला जमीन मिळाला. त्यानंतर हवालदारने आपल्या तीन पोलीस साथीदारांच्या मदतीने गांजा एका पुरवठादाराला लाखो रुपयांना विकला आणि पैसे वाटून घेतले. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने ही बाब उघड झाली. निलंबित पोलिसांच्या विभागीय चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.