प्रतिनिधी/ वडूज
पोलिसांनी आव्हान म्हणून जबाबदारी स्वीकारताना गुन्हेगारी प्रवृत्तीकडून जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी. जिह्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे विशेष लक्ष द्यावे. गुन्हेगारांना पोलिसांचा वचक वाटेल आणि सामान्यांना आधार वाटेल नागरिक विश्वासाने पोलीस स्टेशनला येतील आणि समाधाने परत जातील अशी कामगिरी पोलीस दलांनी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस दलासाठी 10 कोटींचा वाढीव निधी देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
वडूज येथील पोलीस ठाण्याच्या नूतन इमारत उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जि.प. अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख, मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, सुभाषराव शिंदे, प्रा. बंडा गोडसे, संदिप मांडवे, शशिकला देशमुख, जयश्री कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गुन्हेगारीतून पैसे मिळवून प्रतिष्ठा घेणाऱयांना पोलिसांनी ताळ्यावर आणावे. समाजामध्ये पोलिसांची विश्वासार्हता वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे जिह्याच्या धर्तीवर स्मार्ट पोलिसींग योजना राबवावी. नियमित कामात सकारात्मक बदल घडवून आणावेत. पोलिसांना पायाभूत सुविधेसाठी वाढीव निधी मंजूर केला जाईल. समाजात होणाऱया वाढत्या अत्याचाराच्या घटना चिंतनीय आहेत. अत्याचार करणारे कितीही मोठे असले तरी त्याचा मुलाहिजा बाळगू नका. किशोरवयीन मुला मुलींच्या दैनंदिन वागण्याकडे पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरच आहे. शक्ती कायदा राबविण्यासंदर्भात गांभीर्याने विचार विनीमय करणे सुरू आहे. मात्र या कायद्याचा दुरूपयोग होता कामा नये. यावेळी भाषणात मोठा निधी खर्च करून देखील इमारतीचे काम दर्जेदार झाले नसल्याबद्दल अजितदादांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
मंत्री शंभूराज देसाई यांनी भाषणात पोलिसांनी कोरोना काळात मोठय़ा प्रमाणावर दंड वसूल केला आहे. यापैकी पन्नास टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी देण्यात यावा. तर निधीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस व अजितदादा पवार यांनी नेहमीच झुकते माप दिले असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाषणात सांगितले.
जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, सपोनि मालोजीराव देशमुख, दादासाहेब गोडसे, सुनिल गोडसे, बाळासाहेब सोळसकर, प्राचार्य दिलीपराव डोईफोडे, पृथ्वीराज गोडसे आदी उपस्थित होते.