निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी मार्गदर्शन : उमेदवारांच्या दबावाला बळी पडू नका
प्रतिनिधी / बेळगाव
मतदानाची जनजागृती आणि नियमांचे पालन करण्याबाबत टिळकवाडी पोलिसांनी संत मीरा कॉलनीमध्ये नागरिकांची सभा घेतली. त्यावेळी टिळकवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांनी मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
मतदान करताना कोरोनाचे नियम पाळावेत तसेच कोणीही कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. कोणताही उमेदवार दबाव घालत असेल तर तातडीने त्याबाबत तक्रार करण्यास पुढे यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस तुमच्या पाठिशी आहेत. तेव्हा कोणत्याही उमेदवारांच्या दबावाला बळी पडू नका, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शहापूर पोलिसांचीही जनजागृती सभा
शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांनीही मतदानाबाबत जनजागृती करून जनतेला मतदान करण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारचा जातीभेद तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक ही अत्यंत शांततेत पार पडणार आहे. तेव्हा प्रत्येकाने सहकार्य करावे. कोणतीही अडचण आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. कोणीही जातीचे राजकारण करू नये. अत्यंत खुल्या वातावरणात ही निवडणूक पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी
सांगितले.