मार्केट पोलिसांची कारवाई :15 हून अधिक जण फरारी
प्रतिनिधी / बेळगाव
गस्तीवरील पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी दरबार गल्ली येथील दोन तरुणांना मंगळवारी रात्री अटक केली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणातील आणखी 15 हून अधिक जण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
आदिलअहम्मद मुनीरअहम्मद बागलकोट (वय 28), मोहम्मदमुगीरा मोहम्मदमुईन आगा (वय 21, दोघेही रा. दरबार गल्ली) अशी अटक केलेल्या दोघा जणांची नावे आहेत. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
सोमवारी रात्री उशिरा दरबार गल्ली येथे रात्रीच्या गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात 15 हून अधिक जणांवर 143, 147, 341, 353, 332, 323, 504, 506 सहकलम 149 व संसर्गजन्य रोगप्रतिबंधक कायदा-2020 अन्वये एफआयआर दाखल केला.
मंगळवारी रात्री उशिरा अटक केलेल्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले. कोरोना महामारी थोपविण्यासाठी बेळगावसह जिल्हय़ात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, असा आदेश जिल्हा दंडाधिकाऱयांनी दिला आहे. कामाशिवाय फिरू नका, असे सांगणाऱया पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता.