विजापूरयेथीलघटना:चारमित्रांच्यासाहाय्यानेतीक्ष्णहत्यारानेवार
वार्ताहर/ विजापूर
येथील पोलीस दलात श्वानपथक विभागात सेवा बजावणाऱया पोलिसाने आपल्या पत्नीचा चार मित्रांच्या साहाय्याने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. खून करून मृतदेह कोलार नजीकच्या कृष्णा नदी पात्रात पुरून ठेवल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. निंगराज वालीकर असे संशयित पतीचे नाव आहे. सुमंगल निंगराज वालीकर असे मृत पत्नीचे नाव आहे. केवळ तीन दिवसातच पोलिसांनी सदर घटनेचा उलगडा केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, येथील श्वान पथक विभागात निंगराज वालीकर हा सेवा बजावत आहे. सुमंगल हिच्याशी फेसबूक चॅटींगच्या माध्यमातून प्रेम प्रकरण सुरू झाले होते. सुमंगल ही विकलांग होती. यानंतर या दोघांनी लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांनी त्या दोघांमध्ये वारंवार किरकोळ कारणावरुन वाद होत होते. या रागातून निंगराज याने 2 एप्रिल रोजी आपल्या 4 मित्रांना घरी बोलावून घेतले. यावेळी निंगराज याने आपल्या मित्रांच्या सहाय्याने तीक्ष्ण हत्याराने वार करून सुमंगल हिचा खून केला.
दरम्यान निंगराजने खुनानंतर पत्नीचा मृतदेह एक दिवस घरी तसाच ठेवला होता. त्यानंतर निंगराज याने आपल्या आणखी तिघा मित्रांच्या मदतीने मृतदेह कारमध्ये घालून कोलार येथील नदी पात्रात पुरून ठेवला होता. मुलीशी दोन दिवस संपर्क न झाल्याने तिच्या आई-वडिलांनी येथील आदर्शनगर पोलीस स्थानकात जावई निंगराज विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपासकार्य हाती घेऊन दोन दिवसातच खुनाचा उलगडा केला. तसेच संशयित आरोपींनी सुमंगलचा नदी पात्रात पुरून ठेवलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला व तो विच्छेदनासाठी पाठवून दिला. त्यानंतर निंगराजसह त्याच्या चार मित्रांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.