प्रतिनिधी / ओरोस:
रानबांबुळी येथील संप्रसा प्रवीण सावंत यांच्या राहत्या घरातून सोने, चांदी मिळून 35 तोळे दागिन्यांची चोरी झाली आहे. संप्रसा या सिंधुदुर्ग पोलीस दलात कार्यरत आहेत. तर त्यांचे पती महामार्ग वाहतूक पोलीस येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.
मूळचे देवगड येथील सावंत कुटुंबीय रानबांबुळी येथे एका भाडय़ाच्या घरात राहतात. गणेश चतुर्थी सणाला वापरण्यासाठी त्यांनी 6 सप्टेंबर रोजी दागिने ठेवलेले कपाट उघडले. मात्र, त्यांना त्यात दागिने मिळून आले नाहीत. त्यामुळे 23 जून ते 6 सप्टेंबर या कालावधीत घरातील दागिन्यांची चोरी झाली असल्याची तक्रार संप्रसा सावंत यांनी 16 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानकात दिली आहे. पोलिसांनी या दागिन्यांची अंदाजित किंमत सहा लाख 59 हजार 500 एवढी केली आहे. मात्र, आजच्या बाजारभावाने विचार करता ही किंमत 10 ते 12 लाखांच्या आसपास पोहोचत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत त्यांनी एका जवळच्या मित्रावर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञाताविरोधात भा.दं.वि कलम 380 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोते करीत आहेत.
दरम्यान, लॉकडाऊननंतर पुन्हा जिल्हय़ात चोरीचे सत्र सुरू झाले आहे. कणकवली येथे चोरीच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या घरात झालेल्या चोरीने आश्चर्य व्यक्त होत आहे.