बसवराज यलीगार चिकोडीचे नवे डीएसपी
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यातील 34 पोलीस उपअधीक्षक व 48 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा राज्य सरकारने बदल्यांचा आदेश जारी केला असून बसवराज यलीगार यांची चिकोडीच्या पोलीस उपअधीक्षकपदी वर्णी लागली आहे.
बसवराज हे सध्या कर्नाटक लोकायुक्त विभागात कार्यरत आहेत. चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक मनोजकुमार नायक यांची जिल्हा पोलीस मुख्यालयातील डीसीआरई विभागात बदली झाली आहे. याबरोबरच पोलीस उपअधीक्षक रविंद्र शिरुर यांची गुलबर्गा जिल्हय़ातील आळंद उपविभागात बदली झाली आहे.
मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर यांची गुप्तचर विभागात बदली झाली असून त्यांच्या जागेवर हुबळी-धारवाड येथील सीसीबी विभागात कार्यरत असलेले महांतेश बस्सापूर यांची वर्णी लागली आहे. हुबळी-धारवाड वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेट यांची कित्तूरच्या मंडल पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. राघवेंद्र हळ्ळूर यांची हुबळी-धारवाड येथील सीसीबी विभागात बदली झाली आहे.