प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या पोलीस अधीक्षकपदी मुंबई गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त राजेंद्र दाभाडे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून त्यांनीही त्याठिकाणी कार्यभार स्वीकारला आहे.
गेडाम यांची 18 सप्टेंबर रोजी बदली झाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ कार्यभार सोडत सांगलीचा कार्यभार स्वीकारला होता. तोपर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्याजवळ कार्यभार सोपविण्यात आला होता. नवे पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला.