प्रतिनिधी / सातारा :
संगम माहुली येथील जयसिंग दगडु कोळपे (वय 61) यांना अज्ञात व्यक्तीने पोलीस असल्याचे भासवून त्यांच्याकडील सोन्याच्या वस्तू काढून घेत त्यांची सव्वा लाखांची फसवणूक केली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संगम माहुली ते सातारा रोडवरील गणेश कॉलनी येथून दिनांक 15 रोजी 3 वाजून 30 मिनिटांनी जयसिंग दगडु कोळपे व त्यांचे पाहुणे बिरोबा देवाच्या पालखी सोहळयासाठी निघाले होते. यावेळी एक अज्ञात इसम पोलीसांचा ड्रेस घालून रस्त्याच्या बाजुला उभा होता. त्याने जयसिंग कोळपे यांना थांबवले आणि एवढे सोनं का घातलंय, लोक दिवसा चोऱ्या करतात. असे सांगत त्यांना विचलीत करून हातचलाखीने त्यांच्या जवळील 1 लाख 25 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने फसवणूक करून नेले. या अज्ञात चोरटय़ाविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.