किरकोळ कारणातून वाद : कर्तव्यावर नसताना घडली घटना : वाद करणारे कर्मचाऱयांच्या ओळखीचे
प्रतिनिधी / सातारा
मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास गोडोलीनाका येथे हॉटेल मानसीसमोर किरकोळ कारणातून झालेल्या वादानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱयांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी मनोज अरुण डोंगरे (रा. गणेशनगर, विलासपूर सातारा) व प्रसाद उर्फ परश्या विकास महामुनी (रा. विलासपूर सातारा) यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले दत्ता वैजनाथ डोलारे व मधुकर हिंडे हे त्यांची डय़ुटी संपल्यानंतर मित्रांसमवेत कणसे ढाबावर जेवण करण्यासाठी जात होते. यावेळी हॉटेल मानसी समोर गोडोली नाका ते शिवराज तिकाटणे जाणारे रोडवर असणारे भाजीपाल्याचे गाडय़ाजवळ दत्ता डोलारे यांच्या ओळखीचे मनोज डांगरे यांनी येथे का उभा आहे? असे विचारल्याचे कारणावरुन दत्ता डोलारे व मनोज डांगरे यांच्यामध्ये वाद झाला.
यावेळी मनोज डांगरे यांनी त्याच्या साथीदार प्रसाद महामुनी व इतरांना बोलावून घेतले. प्रसाद महामुनी हा येताना हातामध्ये लोखंडी रॉड घेवून आला व त्याने दत्ता डोलारे यांच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर दुखापत केली आहे. तसेच प्रसाद महामुनी याने मधुकर हिंडे यांच्या डाव्या हातावर लोखंडी रॉड मारुन त्यांनाही गंभीर दुखापत केली आहे.
या दोन्ही कर्मचाऱयांवर रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी कॉन्स्टेबल दत्ता डोलारे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस कर्मचाऱयांना मारहाण झाल्याची घटना कळताच पोलीस दलात खळबळ उडाली होती. जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, पोलीस अधीक्षक अपर जिल्हा पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी तातडीने या प्रकाराची माहिती घेत आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या.
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुन्हय़ातील आरोपींचा शोध घेवून मनोज अरुण डोंगरे व प्रसाद उर्फ परश्या विकास महामुनी महामुनी यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल या करत आहेत.