बुदिगोप्प क्रॉसनजीक तिहेरी अपघातात चार ठार : सिमेंटवाहू ट्रकची कार-दुचाकीला धडक
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-बागलकोट रोडवरील बुदिगोप्प क्रॉसजवळ (ता. सौंदत्ती) रविवारी दुपारी सिमेंटवाहू ट्रकने कार व दुचाकीला ठोकरल्याने झालेल्या तिहेरी अपघातात चौघा जणांचा मृत्यू झाला. तर अन्य चौघे जण जखमी झाले आहेत. म़ृतांमध्ये कुडची, ता. रायबाग पोलीस स्थानकातील एका साहाय्यक पोलीस निरीक्षकाची पत्नी व मुलीचाही समावेश आहे. सर्वपित्री अमावास्येच्या पार्श्वभूमीवर बेळगावहून जमखंडी तालुक्मयातील बंडीगणीला देवदर्शनासाठी जाताना ही घटना घडली आहे.
या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक शिवानंद कटगी, मुरगोडचे पोलीस उपनिरीक्षक मौनेश माळी-पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना गोकाक येथील इस्पितळात हलविण्यात आले आहे.
रुक्मिणी यल्लाप्पा हलकी (वय 39), त्यांची मुलगी अक्षता यल्लाप्पा हलकी (वय 21) मूळच्या राहणार ओबलदिन्नी, ता. सौंदत्ती, सध्या राहणार बेळगाव, कारचालक निखिल अरुण कदम (वय 24) रा. कंग्राळी बुद्रुक व मोटारसायकलवरील हणमव्वा बसाप्पा चिप्पलकट्टी (वय 75) रा. भागोजीकोप्प, ता. रामदुर्ग अशी अपघातात ठार झालेल्या दुर्दैवींची नावे आहेत. मुरगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
रुक्मिणी यांची मुलगी पूजा यल्लाप्पा हलकी (वय 18), मुलगा मुत्तू यल्लाप्पा हलकी (वय 14) यांच्यासह मोटारसायकलवरील गदग्याप्पा चिप्पलकट्टी (वय 22), त्याची पत्नी रुपा चिप्पलकट्टी (वय 20) हे जखमी झाले असून त्यांच्यावर गोकाक येथील खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. गदग्याप्पा आपली पत्नी व आजीसह मोटारसायकलवरून जात होता. त्यावेळी सिमेंटवाहू ट्रकने कारला धडक देऊन दुचाकीलाही ठोकरले. त्यावेळी हा अपघात घडला.
लोकापूरहून सिमेंट घेऊन गोव्याला निघालेल्या ट्रकने ठोकरल्याने ही घटना घडली. कारचालक निखिल व रुक्मिणी हे ठार झाले तर अन्य दोघे जण इस्पितळात मृत्युमुखी पडले. बुदिगोप्प क्रॉसवर झालेल्या या अपघातानंतर बघ्यांची गर्दी जमली होती. दोन मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते. जेसीबीच्या साहाय्याने कारचा चेपलेला भाग मोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सर्वपित्री अमावास्येनिमित्त रुक्मिणी व त्यांची तीन मुले बंडीगणी येथे देवदर्शनासाठी निघाली होती. त्यावेळी सिमेंटवाहू ट्रकने ठोकरल्याने एकाच कुटुंबातील दोघा जणांसह चौघांचा मृत्यू झाला. कारचालक निखिलचे वडीलही राज्य राखीव पोलीस दलात सेवेत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. कुटुंबीयांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
वरि÷ पोलीस अधिकारी रात्री उशिरापर्यंत मुरगोडमध्ये तळ ठोकून होते. उत्तरीय तपासणीची प्रक्रियाही सुरू होती. रविवारी दुपारी 12.50 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. सिमेंटवाहू ट्रक भरधाव वेगाने निघाला होता. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना इस्पितळात हलविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली.
पुन्हा एकदा पोलीस कुटुंबावर घाला
रविवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात पुन्हा एकदा पोलीस कुटुंबावर क्रूर काळाने घाला घातला आहे. कुडची पोलीस स्थानकातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यल्लाप्पा हलकी यांची पत्नी व मुलीचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. कारचालक निखिल याचे वडीलही राज्य राखीव दलात सेवेत आहेत. 24 जानेवारी 2021 रोजी याच मार्गावर चचडी क्रॉसजवळ परिवहन मंडळाच्या भरधाव बसने कारला ठोकरल्याने महिला पोलीस उपनिरीक्षक व त्यांचा नवविवाहित मुलगा-सुनेसह चौघा जणांचा मृत्यू झाला होता. मुरगोड पोलीस स्थानकातच या अपघाताचीही नोंद झाली आहे. त्यावेळी महिला पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी नलवडे, त्यांचा मुलगा प्रसाद, सून अंकिता व त्यांच्या नात्यातील दीपा शहापूरकर हे चौघेजण जागीच ठार झाले होते. मुलाच्या लग्नानंतर सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जाताना हा अपघात घडला होता. रविवारची घटनाही देवदर्शनाला जातानाच घडली आहे.