कोल्हापूर / प्रतिनिधी
पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुह्यात मदत करण्यासाठी 25 हजारांची लाच स्विकारुन आणखी 10 हजारांची मागणी करणाऱ्या लक्ष्मीपुरी पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत विभागाने जेरबंद केले. दिग्विजय पांडुरंग मर्दाने (वय 35 रा. शिंगणापूर ता. करवीर) असे त्याचे नांव आहे. याबाबतची फिर्याद धीरज अनिल साखळकर (वय 37 रा. एव्हरग्रीन, नागाळा पार्क) यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांधकाम व्यवसाय असणाऱ्या धीरज साखळकर यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल दिग्वीजय मर्दानेकडे आहे. या गुह्यामध्ये मदत करण्यासाठी मर्दाने याने 27 डिसेंबर 2021 रोजी धीरज साखळकर याच्याकडे 50 हजारांची मागणी केली. या पैकी 25 हजार रुपये त्याने स्विकारले तर त्याने आणखी 10 हजार रुपयांची मागणी केली. 10 हजारांची मागणी केल्याचे सिद्ध झाल्यानंतर सोमवारी मर्दानेस अटक करण्यात आली.
पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस कॉन्स्टेबल मयुर देसाई, संदीप पडवळ, रुपेश माने यांनी ही कारवाई केली.