इथे कारवाई नको, तिथे करा… विचित्र आदेश : आदेशांमागे स्वार्थ कुणाचाही?पण बदनामी खात्याची
प्रतिनिधी / पणजी
पोलीस खात्यातील कामकाजात विविध प्रकारचे स्वार्थी डावपेच सुरु झाले असून त्याचा परिणाम काही प्रामाणिक निरीक्षक व त्यांच्या खालच्या पोलिसांवर होत आहे. अमुक ठिकाणी कारवाई करायची नाही, तमुक ठिकाणीच कारवाई करा, असा आदेश वरिष्ठ अधिकाऱयांकडून पोलिसांना वेळोवेळी येत असतात. त्यामुळे कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणावर प्रत्यक्ष कारवाई कराणाऱया प्रामाणिक पोलिसांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
आपल्या कर्तव्याला न्याय द्यावा की वरिष्ठांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेल्या आदेशांचे पालन करावे? असा प्रश्न सध्या काही पोलिसांसमोर उभा आहे. या साऱया डावपेचामागे काय दडले आहे आणि नक्की कुणाच्या व कसल्या फायद्यासाठी हे डावपेच खेळले जात आहेत, असा प्रश्नही काही पोलिसांनी उपस्थित केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱयांकडून स्वार्थी डावपेच
एखाद्या ठिकाणी गुन्हेगारी प्रकार घडत असेल तर त्या ठिकाणी पोलिसांनी त्वरित जाऊन संबंधीत गुन्हेगारावर कारवाई करणे नितांत गरजेचे असते. ती कारवाई कोणत्या विभागाच्या पोलिसांनी किंवा कोणत्या पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी केली याच्याशी सर्वसामान्य लोकांचे काही देणे घेणे नसते. गुन्हेगारी प्रकरणावर त्वरित कारवाई होणे इतकीच अपेक्षा पोलीस खात्याकडून सामान्य लोक करीत असतात. मात्र सध्या पोलीस खात्यात कोणी, कुठे, कशी व केव्हा कारवाई करावी या डावपेचावरून सुरु असलेल्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या स्वार्थी डावपेचामुळे पोलीस खात्यात बराच गोंधळ माजलेला दिसून येत आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या या कारभारामुळे सामान्य लोकांवर त्याचा परिणाम होत असून पोलीस खाते बदनाम होत आहे, असे काही पोलिसांचे म्हणणे आहे.
वरिष्ठांकडून निघतात तोंडी स्वार्थी आदेश
पोलीस खात्यात गुन्हा अन्वेषण विभाग, अमलीपदार्थ विरोधी विभाग तसेच अन्य काही विभाग हे स्वतंत्र असून त्यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण गोवा आहे. त्यामुळे ते गोव्याच्या कुठल्याही भागात कारवाई करु शकतात. पण त्यांना पेडण्यात कारवाई करु नका, किंवा अन्य कुठेतरी कारवाई करु नका, अशा आदेशांचा अर्थ काय? असा सवाल निर्माण झाला आहे.
अमलीपदर्थ विरोधी विभागाने गेल्या काही महिन्यांत पेडणे व इतर किनारी भागात बेधडक कारवाई करून लाखो रुपये किमतीचे ड्रग्स जप्त केले होते. सीआयडी पोलिसांनीही ठिकठिकणी कारवाया केल्या होत्या. मात्र पेडणे भागात ड्रग्सच्या कारवाया करू नका, तर इतर ठिकाणी लक्ष द्या, असा तेंडी आदेश वरिष्ठांकडून जात असल्याने खात्यात यावरुन असंतोष निर्माण झाला आहे.
पोलिसस्थानकाची हद्द न सोडण्याचाही आदेश
काही पोलिसस्थानकाच्या पोलिसांना त्यांची हद्द सोडून बाहेर जाता कामा नये असेही सांगण्यात आले आहे. केवळ ड्रग्स प्रकरणाकडेच लक्ष केंद्रीत करू नका, तर इतर गुन्हेगारी प्रकरणाकडेही पहा, असेही काही पोलीस स्थानकाच्या पोलिसांना सुनावण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
एएनसीची पेडण्यातील कारवाई का थंडावली?
कोविड 19 काळात लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने गोव्यात पर्यटक व्यवसाय कित्येक महिने बंद होता. लॉकडाऊन उठविल्यानंतर मोठय़ाप्रमाणात राज्यात ड्रग्स आला होता. एएनसी विभागाने तसेच इतर पोलिसस्थानकाच्या पोलिसांनी भराभर कारवाया करून मोठय़ाप्रमाणात ड्रग्स जप्त केला होता. अनेक देशी संशयितांना अटक केली होती. राज्यातील ड्रग्स पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलीस काम करीत आहेत, असे वाटत असतानाच ड्रग्जविरोधी कारवाई गेल्या दोन महिन्यांत का थंडावली? हा मोठा प्रश्न आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांकडून वेळोवेळी निघणाऱया विचित्र आदेशांमुळे पोलिस खात्यात नाराजी पसरलेली आहे.
कनिष्ठ पोलिसांना जगावे लागते नंदीबैलासारखे
वरिष्ठांच्या विचित्र आदेशांमुळे पोलीस बेधडकपणे काम करायला मागेपुढे होत असल्याचे दिसून येते. पेडणे, हरमल, व अन्य ठिकाणी सरत्या वर्षी मोठय़ा कारवाया करुन मोठय़ा प्रमाणात अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते, मात्र जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात हे सारे थंडावल्याची कारणे कोणती, याबाबत पोलीस खात्यात मोठी चर्चा सुरु आहे. नोकरी टिकवायची असल्यास, बदली टाळायची असल्यास, निलंबन टाळायचे असल्यास वरिष्ठांचे आदेश मुकाटय़ाने पाळावे लागतात. योग्य-अयोग्य याचा विचार न करता कनिष्ठ पोलिसांना नंदीबैलासारखे जगावे लागते, अशी संतप्त प्रतिक्रिया काही पोलिसांनी व्यक्त केली आहे.