प्रतिनिधी / कोल्हापूर
चारचाकी चोरीची तक्रार देण्यासाठी आलेल्या फिर्यादीकडून पाच हजाराची लाच घेताना शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक वर्ग-3 सागर इराप्पा कोळी वय 43, श्रीरामनगर, उचगांव लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांचा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी नितीन कदम यांची इनोव्हा कार वापरण्यासाठी आणली होती. 25 ऑक्टोबरला माकडवाला वसाहतीमधील तानाजी व इतर काही लोकांनी नितीन कदम आमचे पैसे द्यायचा आहे, असे सांगून तक्रारदार यांच्याकडून जबरदस्तीने कार घेवून आले. त्यामुळे तक्रारदार मित्रासह शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार चोरीस गेल्याची तक्रार देण्यासाठी आले. या वेळी पोलीस नाईक यांनी सागर कोळी यांनी दोघांमधील वाद मिटवून कार तक्रारदार यांना परत देण्यास सांगितले. यानंतर कार मिळवून देण्यासाठी पोलीस नाईक कोळी यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपयांची मागणी केली. तत्काळ 10 हजार मागितल्याने तक्रारदार यानी ही रक्कम दिली.
तर उर्वरीत 5 हजार रुपये घेवून येण्यास सांगितले. याबाबत तक्रारदार यांनी पोलीस नाईक कोळी यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार मंगळवार 26 रोजी लाचलुचपतच्या पथकाने शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना पथकाने कोळी यांना रंगेहाथ पकडले. तसेच यापुर्वीही 10 हजार रुपये स्विकारल्याचे कबूल केले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेचे पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौंडा, पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मोरे, संजीव बंबरगेकर, अजय चव्हाण, कृष्णात पाटील, रुपेश माने, सुरज अपराध यांच्या पथकाने कारवाई केली.