मालवण /प्रतिनिधी-
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २०२०- २१ या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये महसूल विभागाच्या धोरण व उद्दिष्टांप्रमाणे उत्कृष्ट काम केल्या बद्दल मालवण धुरीवाडा येथील पोलीस पाटील वासुदेव शिवराम गावकर यांचा जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पोलीस पाटील वासुदेव गावकर यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. वासुदेव गावकर यांनी पोलीस पाटील म्हणून मालवण शहरात गेली अनेक वर्षे उत्तम कामगिरी बजावली असून कोरोना महामारी काळातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत नागरिकांना वेळोवेळी सहकार्य केले. या कार्याची दखल घेत त्यांचा जिल्हा प्रशासनाकडून सन्मान करण्यात आला. गावकर यांच्या या सन्मानाबद्दल मालवण शहरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.