सुर्ली घाटात एसटीवर दगडफेक झाल्याने प्रशासन सतर्क, एकुण 52 कर्मचाऱयांचे निलंबन
वार्ताहर/ कराड
मंगळवारी आटपाडीहून कराडला येणाऱया बसवर सुर्ली घाटात दगडफेक झाल्याने. पोलिस व एस. टी. प्रशासन सतर्क झाले असून बुधवारी पोलीस बंदोबस्तात स्वारगेट-कराड-स्वारगेट शिवशाही बसची फेरी पूर्ण केली. कर्मचारी अद्याप आंदोलनावर ठाम आहेत. मात्र एस. टी. प्रशासनानेही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. बुधवारपर्यंत एकुण 52 कर्मचाऱयांचे निलंबन केले आहे. तर रोजंदारीवर काम करणाऱया चार कर्मचाऱयांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. 25 दिवसांपासून एस. टी. सेवा बंद असल्याने कराड आगाराचे 2 कोटींचे नुकसान झाले आहे.
एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, यासाठी राज्यभरातील एस. टी. कर्मचाऱयांनी आंदोलन सुरू केल्यानंतर कराड आगारातील कर्मचाऱयांनीही 25 दिवसांपासून बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे कराड आगाराची एस. टी. सेवा ठप्प झाली आहे. आंदोलनात फुट पडल्यानंतर काही आगारांची एस. टी. सेवा सुरू झाली असल्याने सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणच्या एस. टी. च्या काही प्रमाणात फेऱया कराडला होत आहेत. मात्र मंगळवारी सायंकाळी आटपाडीहून कराडला येणाऱया एस.टी.वर सुर्ली घाटात दगडफेक करण्यात आल्याने पोलीस व एस. टी. प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेमुळे कराड आगारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर कराडला येणाऱया बसेसना पोलीस संरक्षण देण्यात येत आहे.
बुधवारी कराड आगारात एकुण 102 कर्मचारी कामावर हजर होते. यातील 100 कर्मचारी प्रशासन व वर्कशॉप विभागातील आहेत. तर दोन वाहकही बुधवारी कामावर हजर झाले. मात्र एकही चालक हजर न झाल्याने कराड आगारातून एकही फेरी झाली नाही. 25 दिवसांपासून कराड आगाराची प्रवासी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद असल्याने आतापर्यंत कराड आगाराचे 2 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. 25 दिवसांपासून एस. टी. सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याने प्रशासनाने आता संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कराड आगारातील 102 कर्मचाऱयांचे बुधवार अखेर निलंबन केले आहे. तर रोजंदारीवरील 4 कर्मचाऱयांची सेवा समाप्ती केली आहे.