अधिकाऱयांना रोज फेरफटका मारण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
जनस्नेही पोलीस कार्यक्रमांतर्गत शहरातील पोलीस अधिकारी रोज सायंकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत आपल्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात पायपीट करणार आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.
अधिकारी रोज सायंकाळी आपल्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात पायी चालत फेरफटका मारणार आहेत. यावेळी बीटचे पोलीसही त्यांच्यासमवेत असणार आहेत. पायपीट करतानाच परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
पोलिसांच्या कामात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असते. अलीकडे पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी वाढली आहे. अधिकारी आपले कार्यालय सोडून बाहेर पडत नाहीत, अशी परिस्थिती आहे. अनेक जण तर फोनही उचलत नाहीत. पोलीस ठाणे रिअल इस्टेट एजंटांचे अड्डे बनू लागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांपेक्षा एजंटांना स्थान मिळू लागले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिकांच्या मनात नाराजीचा सूर आहे.
आता नागरिकांचे सहकार्य मिळविण्यासाठी सर्व अधिकाऱयांना आपापल्या कार्यक्षेत्रात पायपीट करण्याची सूचना पोलीस अधिकाऱयांनी केली आहे. सध्या बेळगाव शहरात तळ ठोकून बसलेले अनेक अधिकारी थेट वसुलीला लागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना या ना त्या कारणाने वेठीस धरण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. आता जनस्नेही पोलीस कार्यक्रमांतर्गत फेरफटका मारण्याची सूचना अधिकाऱयांना करण्यात आली असून या उपक्रमामुळे तरी प्रतिमा सुधारणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चार वर्षांपूर्वीच राबविला होता उपक्रम : जावेद मुशापुरी
शहापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात यापूर्वी दोन अधिकाऱयांनी असा उपक्रम राबविला आहे. निवृत्त पोलीस अधिकारी डी. सी. लक्कण्णावर व शहापूरचे यापूर्वीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी चार वर्षांपूर्वी हा उपक्रम एका शहापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात राबविला होता. तो यशस्वीही ठरला होता. रोज सायंकाळी आपल्या सहकाऱयांना घेऊन ते फेरफटका मारायचे. नागरिकांच्या गाठीभेटी घ्यायचे. त्यांच्या अडचणी ऐकून घ्यायचे. त्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न करायचे. त्यामुळे पोलीस दलाच्या बाबतीत लोकांच्या मनातील भीती दूर होत चालली होती. थेट अधिकाऱयांना भेटून ते माहिती देत होते. आता संपूर्ण शहरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.