प्रतिनिधी / सातारा :
कोरोना काळात रखडलेल्या पोलीस भरतीला सुरुवात झाली असून बुधवारी 325 जणांनी मैदानी चाचणी दिली. 58 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया पोलीस कवायत मैदान येथे सुरु असून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्यासह अधिकारी यांनी या भरतीच्या ठिकाणी हजेरी लावून सुचना दिल्या.
तब्बल दोन वर्ष सातारा पोलीस दलाची भरती प्रक्रिया थांबली होती. राज्य शासनाच्या गृहविभागाकडून आलेल्या निर्देशानुसार सातारा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी प्रारंभ केला. बुधवारी ही प्रक्रिया शांततेत सुरु होती. पोलीस कवायत मैदानामध्ये ज्यांनी अर्ज केला होता. त्यांनाच मैदानी चाचणीसाठी एन्ट्री दिली जात होती. कोरोनाच्या दोन लस घेतल्या आहेत का हे तपासून सर्व कागदपत्रे पाहून मैदानी चाचणीकरता आतमध्ये घेतले जात होते. मैदानी चाचणीमध्ये धावण्याच्या प्रकारात 100मीटर, 400 मीटर, 800 मीटर व 1600 मीटर अशा चाचण्या घेण्यात आल्या. तसेच गोलाफेक, उंचउडी, लांब उडी या चाचण्या घेण्यात आल्या. तब्बल 58 जागांसाठी 325 जणांची ही चाचणी दिली. या चाचण्या अतिशय पारदर्शक करण्यात येत असून स्वतः पोलीस अधीक्षक बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक बोऱ्हाडे लक्ष ठेवून होते.