निवृत्त सरकारी अधिकाऱयाला अटक, मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
नाईट कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद करण्याची सूचना करणाऱया पोलीस उपनिरीक्षकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. गुरुवारी रात्री मार्केट पोलीस स्थानकाजवळ ही घटना घडली असून या प्रकरणी एका निवृत्त सरकारी अधिकाऱयाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर झालेली वादावादी, शिवीगाळ व धक्काबुक्कीच्या प्रकाराने रात्री एकच धावपळ उडाली होती. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन संबंधिताला अटक केली. अशोक होळी (वय 63, रा. गांधीनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या निवृत्त अधिकाऱयाचे नाव आहे. त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
मार्केटचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक यरगट्टी हे गुरुवारी रात्री दुकाने बंद करण्याची सूचना करीत होते. त्यावेळी क्षुल्लक कारणावरून वादावादीचा प्रसंग घडला. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाबरोबर वादावादी सुरू असल्याचे पाहून पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर हे तेथे दाखल झाले. त्यांना धमकावून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.
पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. भा.दं.वि. 341, 353, 332, 324, 323, 504, 506 अन्वये येथील मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी पुढील तपास करीत आहेत.