वार्ताहर/ कराड
ओगलेवाडी (ता. कराड) येथे स्टेशन रोडला रात्रीच्या वेळी आरडाओरडा करणाऱया युवकांना समजावण्यासाठी गेलेल्या हवालदार व होमगार्डला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
चैतन्य बाळासाहेब ओव्हाळ (वय 25), पंकज संजय डुबल (वय 25), रोहित चन्ने (वय 28), आफताब सिकंदर शेख (वय 22 सर्व रा. मळा वॉर्ड, ओगलेवाडी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार धीरज कोरडे व होमगार्ड पवार हे शनिवारी रात्री ओगलेवाडी, सैदापूर, विद्यानगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. रात्री बाराच्या सुमारास ओगलेवाडी हद्दीतील रेल्वे स्टेशन रोडच्या डाव्या बाजूस पाईप कंपनीच्या बंद पडक्या घराबाहेर काही युवक मोठमोठय़ाने आराडाओरडा करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार कोरडे व होमगार्ड पवार तेथे गेले असता चैतन्य ओव्हाळ, पंकज डुबल, रोहीत चन्ने, आफताब शेख हे चौघेजण दारू पित होते.
त्यावेळी कोरडे यांनी आम्ही पोलीस आहोत. तुम्ही आरडाओरडा करू नका, त्यामुळे शेजारी राहणाऱया लोकांना त्रास होत आहे, असे म्हणाले असता पंकज व रोहित या दोघांनी पोलिसांना इथून निघून जा, तुला लय जड जाईल, अशी धमकी दिली. तर चैतन्य याने पोलीस हवालदार कोरडे यांची कॉलर धरून त्यांना मारहाण केली. त्या झटापटीत कोरडे यांच्या हाताला मार लागला. तसेच आफताब शेख याने शिवीगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी हवालदार धीरज कोरडे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे करीत आहेत.