वृतसंस्था/ नवी दिल्ली
फोक्सवॅगन इंडिया भारतात पोलो आणि वेंटो या दोन कार्सचे उत्पादन बंद करणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या जूनपासून सदरच्या कारचे उत्पादन थांबवले जाणार असल्याची माहिती आहे.
फोक्सवॅगन इंडिया सध्याला टायगुनच्या नव्या वाहनावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. या सोबतच नव्या आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त कार्सना बाजारात दाखल करण्याच्या दृष्टीने कंपनी गांभीर्याने विचार करते आहे. दुसरीकडे मात्र वेंटो व पोलोचे उत्पादन बंद केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येत्या जून महिन्यापासून सदरच्या कार्सचे उत्पादन बंद केले जाऊ शकते. मात्र याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा मात्र केलेली नाही. पोलो ही गाडी भारतामध्ये 2010 मध्ये पहिल्यांदा दाखल करण्यात आली होती. येणाऱया महिन्यांमध्ये वेंटो सेडानच्या जागी वर्टस ही नवी गाडी लाँच केली जाण्याची शक्यता सांगितली जात आहे.
वर्टस 8 मार्चला येण्याचे संकेत
सदरची नवी मिड साइज सेडान ‘वर्टस’ ही गाडी भारतासह जागतिक स्तरावर 8 मार्चला सादर करण्याची शक्यता आहे. न्यू इंडिया 2.0 अंतर्गत कंपनीची ही दुसरी गाडी बाजारात येईल. याआधी टायगुन ही गाडी लाँच करण्यात आली होती. दोन इंजिनच्या पर्यायांसह सदरची गाडी सादर केली जाणार असून 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स व 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर टॉर्क कन्वर्टर ऑटोमेटीक ट्रान्स्मीशनची सुविधा असेल, असे सांगितले जाते.