प्रतिनिधी/ काणकोण
गोव्याच्या विविध भागांमध्ये अडकून पडलेल्या आतापर्यंत 1550 कामगारांना आणि अन्य नागरिकांना पोळे चेकनाक्यावरून कर्नाटकात प्रवेश देण्यात आला आहे. शुक्रवार 8 रोजी एकाच दिवशी 1024 नागरिकांना या चेकनाक्यावरून कर्नाटकात पाठविण्यात आले. त्यात विशेषता उत्तर कन्नड जिल्हा, गदग या भागांतील नागरिकांचा समावेश राहिला.
हे मजूर आणि अन्य नागरिक म्हापसा, कळंगूट, हणजुणे, वाघातोर या भागांतून खास बसेसमधून पोळे चेकनाक्यावर आले होते. मात्र कर्नाटकातील रेड आणि ऑरेंज झोनमधील जे नागरिक आहेत त्यांना प्रवेश दिला जात नाही, अशी माहिती काणकोणचे मामलेदार विमोद दलाल यांनी दिली. आतापर्यंत जे मजूर आणि अन्य नागरिक कर्नाटकात गेलेले आहेत त्यांच्याजवळ त्या त्या भागातील आधार कार्ड आहे, असे सांगण्यात आले.
चेकनाक्यावर गर्दी
सध्या सकाळी 8 पासूनच पोळे चेकनाक्यावर अशा नागरिकांची गर्दी उसळत असते. मात्र वैद्यकीय तपासणी आणि अन्य सर्व सोपस्कार करण्यात बराच वेळ जात असतो. त्यामुळे दुपारपर्यंत पक्रिया पूर्ण होते. पोळे चेकनाक्यावर तैनात केलेले विशेष अधिकारी, उपजिल्हाधिकारी प्रीतिदास गावकर, मामलेदार दलाल, पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, तुकाराम चव्हाण, रमेश शिरोडकर, आरोग्य खात्याचे कर्मचारी या सर्व गोष्टींवर देखरेख ठेवून आहेत.
दरम्यान, गोव्यातील जे नागरिक कर्नाटकात अडकून पडले होते त्यांना गोव्यात प्रवेश देण्यात आलेला आहे. गोवा सरकारात नोकरी करून निवृत्त झालेल्या आणि सध्या सदाशिवगड, कारवार येथे स्थायिक झालेल्या तीन-चार जणांनाही पोळे चेकनाक्यावरून प्रवेश देण्यात आला असल्याचे दलाल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तिसऱया दिवशी देखील आपल्या गावी जाण्यासाठी परप्रांतीय कामगारांनी काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात येऊन नोंदणी केली.