कारवारच्या नागरिकांकडून मिठाई वाटून आनंदोत्सव
प्रतिनिधी/ काणकोण
मागच्या साडेपाच महिन्यांपासून बंद असलेला पोळे चेकनाका काल मंगळवारी 1 सप्टेंबरपासून अखेर खुला झाला आहे. कारवारच्या कर्नाटक वेदिका संघटना, विद्यार्थी संघटना, कुमठा, अंकोला येथील रिक्षा, टॅक्सी युनियन यांनी पोळे चेकनाका खुला करण्याची मागणी करत 29 ऑगस्ट रोजी धरणे धरले होते आणि गोवा सरकारने 1 सप्टेंबरपासून चेकनाका खुला केला नाही, तर उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. गोवा सरकारने आपला शब्द पाळला, असे सांगून या आंदोलनाचे नेते रघू नाईक आणि कारवारच्या अन्य नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करताना माजाळी, पोळे चेकनाक्यांवरील कर्मचाऱयांना मिठाई वाटली.
यावेळी स्थानिक पत्रकारांशी बोलताना रघू नाईक यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय, काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू, मामलेदार विमोद दलाल, दोन्ही चेकनाक्यावरील कर्मचाऱयांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कारवारच्या नागरिकांनी मानले आभार
कारवार भागातील कित्येकजण या कालावधीत अंधार कोठडीत पडल्याप्रमाणे राहिले होते. त्यांच्या औषध-पाण्यावर परिणाम झाला होता. कित्येक जणांना आपल्या नातेवाईकांपासून दूर राहावे लागले, सणासुदीवर परिणाम झाला. केंद्र सरकारने निर्बध हटविल्यानंतर गोवा सरकारने देखील चेकनाके खुले केल्याबद्दल कारवारच्या या नागरिकांनी आभार मानले आहे.
लॉकडाऊन काळातील तपासणी कक्ष हटविले
पोळे चेकनाका खुला केल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात या ठिकाणी परराज्यांतून येणाऱया आणि परराज्यांत जाणाऱया नागरिकांच्या चाचणीसाठी उघडलेले खास कक्ष हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे पोलीस, अबकारी, वन खाते आणि अन्य खात्यांचे तपासणी नाके तेवढे शिल्लक राहिले आहेत.
पेट्रोलसाठी कारवारकरांची पोळेत गदाa
चेकनाका खुला झाल्यानंतर विशेष अशी वाहनांची गर्दी या ठिकाणी दिसली नाही. मात्र माजाळी, सदाशिवगड, कारवार भागांतील दुचाकीस्वारांनी पोळे येथील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी केली, तर पैंगीण, माशे परिसरांतील स्थानिक नागरिकांनी माजाळी, सदाशिवगड येथून मासळी आणण्यासाठी प्रयाण केले, अशी माहिती चेकनाक्यावरील पोलीस उपनिरीक्षकांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.