प्रतिनिधी / गोडोली
“कोरोनाची धास्ती वाढत सोशल डिस्टंन्सींग ठेवण्यासाठी पोवई नाक्यावरील प्रांत कार्यालयाचा परिसर नो पार्किंग झोन करण्याचे घोषित करण्यात आले आहे. सोमवार २२ जूनपासून नागरिकांना कार्यालय परिसरात दुचाकी,तीनचाकी, चारचाकी खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली असून उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल,”असे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सांगितले आहे.
सातारा प्रांत, तहसीलदार, दुय्यम निबंधक,भूमी अभिलेख सह अन्य कार्यालय ही पोवई नाक्यावर एकत्र आहेत. नेहमीच मोठी वर्दळ असलेल्या या परिसरात खाजगी वाहनांची गर्दी होत असते.कोरोना -१९ या संसर्गजन्य आजारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सोशल डिस्टंन्सींग पाळणे आवश्यक आहे. या कारणास्तव सोमवार दि.२२ जून पासून प्रांत कार्यालयाच्या परिसरात नो पार्किंग झोन घोषित करण्यात येत आहे. संपूर्ण परिसरात खाजगी चारचाकी, तीनचाकी,दोनचाकी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. सदर परिसरात येणाऱ्या नागरीकांनी आपली वाहने आपआपल्या जबाबदारीवर सुरक्षित ठिकाणी लावावीत. तहसिल कार्यालयाचे परिसरात अनाधिकृतपणे वाहन पार्किंग केलेचे आढळून आल्यास सदरच्या वाहनांवर पोलीस कारवाई करुन दंडात्मक कारवाई केली जाईल. याची सर्व नागरीकांनी नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे,”असे आवाहन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.