शाहीर रामानंद ऊगले यांच्या पहाडी आवाजाने रसिक हरपले :कोरे गल्ली येथे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
शिवकाळापासून आजपर्यंत पोवाडय़ांमधून समाज प्रबोधन केले जात असते. आपल्या पहाडी आवाजातून शाहीर शिवरायांचे गुणगान गात समाजाला शहाणे करण्याचा प्रयत्न करीत असतो. रविवारी शाहीर रामानंद ऊगले यांनी आपल्या अशाच पहाडी आवाजातून शिवचरित्र उलगडून दाखविले. बऱयाच दिवसांनंतर बेळगावमध्ये असा मोठा शाहिरी कार्यक्रम झाल्यामुळे शहापूर कोरे गल्ली येथे शिवभक्तांची तुडुंब गर्दी झाली होती.
कोरे गल्ली शहापूर येथील सन्मित्र साप्ताहिक वार्षिक फंडाच्या 71 व्या वर्धापन सोहळय़ानिमित्त झी युवा संगीत सम्राट फेम युवा शाहीर रामानंद ऊगले यांचा ‘शिवचरित्र पोवाडा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. व्यासपीठावर सन्मित्र साप्ताहिक वार्षिक फंडाचे अध्यक्ष शिवाजी हावळाण्णाचे, तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे, माजी महापौर महेश नाईक, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, गल्लीतील पंच शांताराम गावडोजी, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
छोटय़ा शाहिराने जिंकली मने
शाहीर रामानंद ऊगले यांच्या समवेत स्वानंद धुमाळ हा 5 वर्षांचा शाहीरही आला होता. त्याने सादर केलेल्या पोवाडय़ाने उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली. एकीकडे शाहिरांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे भावी पिढी पोवाडय़ांकडे वळत असल्याचे पाहून सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. शिवजन्मापूर्वीचा काळ ते शिवरायांच्या एक एक स्वाऱया त्याने पोवाडय़ातून कथन केल्या.
‘माझी मैना’ पोवाडय़ाला मिळाला वन्समोअर
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाला बळ देण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाडय़ांनी केले. त्यातीलच एक ‘माझी मैना गावाकडे राहिली’ या पोवाडय़ातून बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची व्यथा मांडली होती. शाहीर रामानंद यांनी हा पोवाडा सादर करताच उपस्थितांनी टाळय़ांची दाद देत पोवाडा पुन्हा सादर करण्याची विनंती केली. याचसोबत शाहीर रामानंद यांनी गायिलेल्या ‘गाडी घुंगराची’ या गीताने उपस्थितांना थिरकायला लावले.