वारंवार तक्रार करूनही अधिकाऱयांचा बेजबाबदारपणा
प्रतिनिधी/ बेळगाव
मुख्य पोस्ट कार्यालयासमोरील पोस्टमन चौकात उद्यान निर्माण करण्याचे काम कॅन्टोन्मेंट बोर्डने सुरू केले आहे. पण या चौकात असलेल्या खड्डय़ांकडे कॅन्टोन्मेंट प्रशासनाने कानाडोळा केला आहे. यामुळे या ठिकाणी खचलेला रस्ता आणि निर्माण झालेले मोठेमोठे खड्डे वाहनधारकांना धोकादायक बनले आहेत.
‘पोस्टमन चौक’ असे नामकरण करून या ठिकाणी पोस्टमनचा पुतळा बसविण्यात आला. तसेच मुख्य पोस्ट कार्यालयासमोर असलेल्या खुल्या जागेत उद्यान निर्मितीचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे. याकरिता कॅन्टोन्मेंट बोर्डने निधी मंजूर करून काम सुरू केले आहे. मात्र याच चौकातील रस्ता पावसामुळे खचला आहे. याठिकाणी संपूर्ण चौकात खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच पाटील गल्लीतील नाल्याजवळ मोठा खड्डा निर्माण झाला असून शहरात येणाऱया नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खड्डय़ाचा आकार मोठा झाल्याने नागरिकांनी त्यामध्ये दगड घातले आहेत. वाहनधारक खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करीत असल्याने अपघात घडत आहेत. याठिकाणी पाटील गल्ली, मुजावर गल्ली आणि शिवाजी रोड असे तीन रस्ते मिळत असल्याने वाहनांची गर्दी नेहमीच असते. तसेच रेल्वे स्टेशन रोड, खानापूर रोड व इस्लामिया शाळेकडे जाणारे रस्ते असल्याने हा चौक नेहमी गजबजलेला असतो. याठिकाणी पोस्ट कार्यालय असल्याने वृद्ध नागरिकांची ये-जा असते. पण याठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. सेंट मेरी शाळेकडून चौकाला जोडणाऱया रस्त्याच्या कॉर्नरवर गटार उघडय़ावरच ठेवण्यात आली आहे. यामुळे अडचणी निर्माण झाल्या असूनदेखील कॅन्टोन्मेंट प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.