नोंदणी केलेल्या 1384 पैकी 1135 वृद्ध मतदारांनी बजावला हक्क
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे 80 वर्षावरील वृद्धांना पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्याची मुभा उपलब्ध करण्यात आली आहे. या दरम्यान दि. 8 व 9 एप्रिल रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेवेळी 1384 मतदारांपैकी 1135 मतदारांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला. या दरम्यान नोंदणी केलेल्या 82 टक्के वृद्ध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेल्या सुविधेचा लाभ वृद्ध नागरिकांनी घेतला.
80 वर्षावरील वृद्धांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे अडचणीचे आहे. तसेच मतदान केंद्रावर गेल्यानंतर दबावाखाली किंवा मतदानासाठी जाण्याकरिता कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. सध्या कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर 80 वर्षावरील वृद्धांना पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्याची मुभा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली होती. याकरिता बीएलओद्वारा 80 वर्षावरील मतदारांची यादी तयार करून नोंदणी करून घेण्यात आली होती. या नोंदणीच्या आधारे वृद्ध नागरिकांचे मतदान घरोघरी जाऊन घेण्यात आले. ही प्रक्रिया दोन टप्प्यात राबविण्यात आली. 1384 मतदारांनी पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्यासाठी नोंदणी केली होती. गुरुवार दि. 8 रोजी सकाळी 7 पासून सायंकाळी 6 पर्यंत मतदान घेण्यात आले. यावेळेत 1384 पैकी 909 वृद्ध नागरिकांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती साहाय्यक निवडणूक अधिकारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली. यासाठी 12 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक पथकामध्ये प्रोसायडिंग ऑफिसर, असिस्टंट प्रोसायडिंग ऑफिसर, पी. ओ. आणि बीएलओ तसेच व्हिडिओग्राफरची नियुक्ती करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्यात आली. वृद्ध नागरिकांना ही सुविधा सोयीस्कर ठरली असून या सुविधेचे स्वागत करण्यात आल्याची माहिती जगदीश के. एच. यांनी दिली.
शुक्रवार दि. 9 रोजी उर्वरित मतदारांचे पोस्टल बॅलेटद्वारा मतदान घेण्यात आले. यावेळी दक्षिण मतदारसंघात 98 आणि उत्तर मतदारसंघातील 128 वृद्ध मतदारांनी मतदान केले. त्यामुळे नोंदणी केलेल्या 1384 पैकी 1135 वृद्ध नागरिकांनी पोस्टल बॅलेटद्वारे घरबसल्या मतदान केले आहे.