प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने ज्ये. नागरिकांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. याकरिता पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी करून घेण्यात आली आहे. शहरातील दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात 1375 मतदारांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये दोन दिव्यांगांचाही समावेश आहे.
कोरोना नियमावलीचे पालन करत निवडणूक प्रक्रिया राबविण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच 80 वर्षांवरील ज्ये, नागरिक व रुग्णांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने बजावला आहे. 80 वर्षांवरील मतदारांची यादी तयार करून त्यांना पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे.
यापूर्वी पोस्टल मतदान करण्याची सुविधा केवळ सरकारी कार्यालयांतील अधिकारी किंवा अन्य राज्यात नोकरी करणाऱया नोकरवर्गासाठी होती. मात्र, आता ज्ये, नागरिक, दिव्यांग आणि रुग्णांनाही पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोना बाधितांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याऐवजी पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सध्या केवळ वृद्ध आणि दिव्यांगांची नोंदणी करून घेण्यात आली आहे. 80 वर्षांवरील ज्ये, नागरिकांची यादी तयार करून घरोघरी जाऊन पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करणार का? याची नोंदणी बीएलओद्वारा करून घेण्यात आली होती. दिव्यांगांची नोंदणीही करून घेण्यात आली आहे.
निवडणूक विभागाकडून सुविधा
उत्तर विभागात 652 वृद्धांनी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 9 अधिकाऱयांनी पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्याची नोंदणी केली असून, दक्षिण मतदारसंघात 721 वृद्ध आणि 2 दिव्यांगांनी पोस्टल मतदानाकरिता नोंदणी केली आहे. त्यांना पोस्टल बॅलेट पेपर उपलब्ध करून देण्याची सुविधा निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे.
एकूण 1373 वृद्धांनी पोस्टल बॅलेटद्वारा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नोंदणी केली आहे. मतदानाच्या तारखेदरम्यान कोरोनाची लागण झाल्यास त्या रुग्णांनाही पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.