रिपब्लिकन पार्टीचा तीव्र विरोध : पोस्टल विभागाला 1.87 लाख कोटींचा निधी देण्याचा प्रस्ताव
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील संसदेचे कनिष्ठ सभागृह हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पोस्टल सर्व्हिस विधेयक शनिवारी संमत झाले आहे. या विधेयकात पोस्टल विभागाला मेल-इन बॅलेट लवकर लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 25 अब्ज डॉलर्सचे (सुमारे 1.87 लाख कोटी) निधीसहाय्य करण्याचा प्रस्ताव आहे. रिपब्लिकन पार्टीने या विधेयकाला विरोध केला असला तरीही सभागृहाच्या 435 पैकी 257 सदस्यांनी पाठिंबा दिल्याने ते संमत झाले आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मेल इन बॅलेटद्वारे निवडणूक करविण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणत असल्याने हे विधेयक मांडणे गरजेचे होते. अध्यक्षीय निवडणुकीशी संबंधित मेल इन बॅलेट योग्यवेळी लोकांपर्यंत पोहोचू नयेत याकरता ट्रम्प हे पोस्टमास्टर जनरल लुईस डिजॉय यांच्यासोबत प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी केला आहे.
सिनेटमध्ये होणार मतदान
या विधेयकावर आता सिनेट म्हणजेच वरिष्ठ सभागृहात मतदान होणार आहे. या सभागृहात रिपब्लिकन पार्टीला बहुमत प्राप्त आहे. सिनेटमध्ये याला संमती मिळाल्यास ते मंजुरीसाठी अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. सभागृहाच्या अध्यक्षा पेलोसी यांच्याकडून मांडण्यात आलेल्या या विधेयकाला कायद्याचे स्वरुप घेण्याची मंजुरी देणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या विधेयकावर ट्रम्प यांना स्वतःचा नकाराधिक वापरण्यासाठी सांगितले जाऊ शकते, असे व्हाइट हाउसने म्हटले आहे. अमेरिकेच्या घटनेनुसार अध्यक्षांच्या स्वाक्षरीशिवाय कुठल्याही विधेयकाला मंजुरी दिली जाऊ शकत नाही.
डेमोक्रेट्सचा आरोप
ट्रम्प यांच्या जवळचे मानले जाणारे पोस्टमास्टर जनरल लुइस डिजॉय यांनी पोस्टल सेवेच्या कामकाजाची पद्धतच बदलली आहे. ट्रम्प यांच्या फूसमुळे डिजॉय विभागाला दिला जाणारा निधी कमी करत आहेत. पत्रांची छाननी करण्यासाठी वापरली जाणारी शेकडो यंत्रे हटविण्याचा निर्देश त्यांनी दिला आहे. याचबरोबर अन्य यंत्रेही हटविण्याची योजना ते आखत असल्याचा आरोप डेमोक्रेटिक पार्टीने केला आहे. पूर्वीच्या तुलनेत पत्रे पोहोचविण्यास विलंब होत असून त्यामागे कोरोना महामारी कारणीभूत असल्याचे डिजॉय यांनी म्हटले आहे.
मेल-इन बॅलेट
अध्यक्ष ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी मेल-इन बॅलेट्स फसवणूक असल्याचे म्हटले होते. डेमोक्रेट्स 2020 च्या निवडणुकीत फसवणूक करू पाहत आहेत. अन्य देशांमधून लाखो लोक मेल-इन बॅलेट पाठवतील, असा दावा त्यांनी केला होता. कोरोना संकट पाहता अमेरिकेच्या निवडणुकीत मेल-इन बॅलेटचा वापर करण्याची मागणी होत आहे. डेमोक्रेटिक पार्टीसह ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचे काही सदस्यही याच मताचे आहेत.
ट्रम्प यांच्याविरोधात खटला
प्रतिनिधिगृहासाठीच्या डेमोक्रेट उमेदवारासमवेत अनेकांनी अध्यक्ष ट्रम्प आणि पोस्टमास्टर जनरल यांच्याविरोधात पोस्टल विभागाचा निधी रोखल्याचा आरोप करत खटला दाखल केला आहे. 7 ऑगस्ट रोजी मॅनहॅटन संघीय न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. नोव्हेंबरपूर्वी विभागाला पुरेसा निधी देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.