वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कोरोना संक्रमणातून मुक्त झाल्यावरही काही जणांना विविध प्रकारचे त्रास होत आहेत. कोरोनाबाधितांमध्ये संक्रमणमुक्त झाल्यानंतर काही आठवडे किंवा महिन्यांपर्यंत लक्षणे कायम राहतात. या स्थितीला पोस्ट-कोविड लक्षणे म्हटले जाते. या पोस्ट-कोविड लक्षणांवरून केंद्र सरकारने गुरुवारी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचनांमुळे रुग्णांच्या उपचारात मदत होणार आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. दीर्घ कालावधीपर्यंत सुरू राहिलेल्या आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी पोस्ट-कोविड व्यवस्थापनावर राष्ट्रीय व्यापक मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामुळे आरोग्य कर्मचाऱयांना पोस्ट-कोविड गुंतागुंतीसाठी तयारी करणे आणि रुग्णांवर उपचार करण्यास मदत मिळणार असल्याचे मांडविया यांनी म्हटले आहे.
वैद्यकीय जगतासाठी व्यापक दिशानिर्देश प्रदान करणारी ही भारतात पोस्ट-कोविड व्यवस्थापनावर राष्ट्रीय व्यापक मार्गदर्शक तत्वांच्या 7 मॉडय़ूलची पहिली साखळी आहे. यात आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी मानसिक आरोग्याला हाताळण्याकरता एक मॉडय़ूल सामील असून ते अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनातून बरे झाल्यावरही रुग्णांमध्ये त्याच्याशी संबंधित कुठले ना कुठले लक्षण दिसून येत आहे. यात श्वास घेण्यास त्रास होणे आणि थकवा यांचा समावेश आहे. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागलेल्या लोकांमध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येत
आहेत.
पोस्टकोविड लक्षणे मुलांमध्येही
केरळच्या आरोग्य मंत्रालयानुसार मागील 5 महिन्यांमध्ये केरळमध्ये 4 मुलांचा मृत्यू झाला तर 300 हून अधिक मुले मल्टी-सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम-इन चिल्ड्रन (एमआयएस-सी)ला तोंड देत आहेत. एमआयएस-सी केरळसाठी एक नवी चिंता ठरली आहे. राज्यात दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून कोरोनाबाधितांची संख्या अधिक राहिली आहे.