वारणानगर / प्रतिनिधी
पोहाळे (ता.पन्हाळा) येथे शेतातील बांधावरील झाड उपडले या कारणावरून चुलत भावा भावात झालेल्या वादात एकजण जखमी झाला. सागर जोतीराम मिसाळ (वय ३५) (रा.पोहाळे ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी तिघां विरोधात कोडोली पोलिसात गुन्हा दाखल झाला असून फिर्याद जखमी सागर याने पोलिसात दिली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोहाळे येथील मिसाळदरा शेतात सागर हा पाणी पाजत असताना ऋत्वीक बबन मिसाळ , अनिकेत बबन मिसाळ व बबन भिमराव मिसाळ हे तिघे तेथे येऊन बांधावरील झाड कोणीतरी उपडले म्हणुन शिवीगाळ करीत असताना सागर याने तुम्ही शिवीगाळ कोणाला देत आहे असे विचारत असताना तिघे अंगावर धावून खोऱ्याने मारहाण केली यात सागर याच्या डोक्याला मार लागला त्याला तातडीने कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नामदेव सुतार करीत आहेत.